श्रेयश वानखेडे:
ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू सह मुरमाचेही अवैध उत्खनन व वाहतूक होत आहे हा सर्व प्रकार होत असताना या तस्करांना कोणीही जाब विचारणारा अथवा कारवाई करणारा अधिकारी कर्मचारी उरला नाही त्यामुळे या तस्करांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. मुरुमाची चोरी मोठ्या प्रमाणात तालुक्यात होत आहे.
मुरूम, वाळू तस्करीच्या संदर्भाने अनेक वृत्तपत्रातून बातम्या प्रकाशित होत असतात मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई करायची नाही असा पवित्रा घेतला असल्यागत परिस्थिती दिसत असून या भूमिकेमुळे शासनाचा खुप मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. शासनाचे नोकरच शासनाचा महसूल बुडवत असतील तर या पगारी नोकरांचा काम काय असा प्रश्न पडतो. पगार मिळत असतानाही जर हे अधिकारी निव्वळ धनार्जनाकरिता शासनाचा महसूल बुडवत असल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निष्कसित करायला पाहिजे मात्र सर्व मॅनेज होत असल्याने वरिष्ठ अधिकारी सुद्धा या प्रकरणाची दखल घेत नाही. एवढेच नाही तर ज्या लोकप्रतिनिधीला नागरिकांनी त्यांचे प्रतिनिधित्व करण्यास धाडले ते लोकप्रतिनिधी सुद्धा या प्रकरणाकडे लक्ष देत नसल्याने हे लोकप्रतिनिधी सुद्धा धनार्जनात मग्न असल्यानेच लक्ष देत नसल्याचा सुर नागरिकांतून पुढे येत आहे.
ब्रह्मपुरी शहरानजीक असलेल्या एका गावातील मुरूम तस्कराची दादागिरी वाढली असून तो नाममात्र रॉयल्टीवर दिवसभर हजारो ब्रास मुरमाची तस्करी तहसील कार्यालया समोरून करत आहे. तहसील कार्यालयाच्या समोरूनच मुरमाची ओवर लोड वाहने जात असून देखील या तस्करावर कोणताही अधिकारी कारवाई करत नसल्याने या मुरुम तस्कराची दादागिरी वाढली असल्याचे निष्पन्न होतो.