महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला मोठे यश
श्रीमती कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर/ जळगाव ह्या परिषदेच्या पाठपुराव्यामुळे अखेर निलंबित.
श्रेयश वानखेडे:
श्रीमती कल्पना चव्हाण या दिनांक: 28/02/ 2022 पासून शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर येथे कार्यरत होत्या. तेव्हापासून चंद्रपूर जिल्ह्यातील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरण उपदान, वैद्यकीय देयके, वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रकरणे, गट विमा लाभ, वैयक्तिक मान्यता प्रकरणे. असे अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवलेत. कर्मचाऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाण घेतल्याशिवाय प्रकरण निकाली न काढणे, भ्रष्टाचार करणे, सेवा हमी कायद्याचे उल्लंघन करणे, कार्यालयातील कामकाजावर, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवणे, दप्तर दिरंगाई करणे, एक वर्षावरील सेवानिवृत्त उपदान प्रकरणे एकूण 56, वैद्यकीय प्रकरणे 43, वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव 31, निवडश्रेणी प्रकरणे 38, लोकसेवा हमी कायद्यांतर्गत चुकीचा अहवाल वरिष्ठांना सादर करणे यामुळे जिल्ह्यातील कार्यरत कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी संस्था चालक यांना सतत आर्थिक व मानसिक समस्येला तोंड द्यावे लागत होते.
त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला सतत प्राप्त होत होत्या. त्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपूर व नागपूर विभाग पदाधिकारी यांनी श्रीमती कल्पना चव्हाण यांच्या भ्रष्टाचाराबाबत लढा उभारत अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तक्रारीची सतत सत्यता शोधून वेळोवेळी पुरावे गोळा करून शासन प्रशासन यांचेकडे सतत पुराव्यानिशी पाठपुरावा केला. यासाठी संबंधित कार्यालयाकडे शासन प्रशासनाकडे तक्रार निवेदने देऊन, धरणे आंदोलने मोर्चा काढून, वर्तमानपत्रात भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती करून, मान. नागो गाणार आमदार पदावर कार्यरत असताना श्रीमती कल्पना चव्हाण यांची विभागीय चौकशी करून निलंबित करावे व एसआयटीमार्फत चौकशी करावी अशा प्रकारचे निवेदन शासनाकडे वारंवार दिले .
वरील पाठपुराव्यामुळे मान. आयुक्त शिक्षण यांनी जानेवारी 2024 मध्ये श्रीमती कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी यांचे वर दोषारोप पत्र दाखल करून निलंबनाची कारवाई केली.
मात्र शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना ज्या संघटनेने कधीही तक्रार केली नाही ते यांचे श्रेय घेण्याच्या बाबतीत बातम्या प्रकाशित करीत आहे हे साफ खोटे व दिशाभूल करणारे आहे हे यश फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आहे या पत्रकार परिषदेला विभाग उपाध्यक्ष विनोद पांढरे, उपाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, विभाग संघटन मंत्री रामदास गिरटकर, जिल्हाध्यक्ष विलास खोंड, जिल्हा कार्यवाह दिलीप मॅकलवार, जिल्हा महिला आघाडी प्रमुख कुमारी संध्या गिरटकर, कॉन्व्हेंट विभाग प्रमुख विवेक आंबेकर, प्राथमिक विभागाच्या अध्यक्ष सौ. सविता सोनकुसरे, कार्यवाह विकास नंदुरकर, मनोहर झोडे, शीतल पिसे, विना आंबटकर, स्मिता चामाटे, शुभांगी डोंगरवार, प्रदीप रत्नावर, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.