Wednesday, June 24, 2026
HomeChandrapurम्हाडा वसाहतीतील मूलभूत सुविधांचा अभाव दूर करा; १२३ पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरे...
spot_img

म्हाडा वसाहतीतील मूलभूत सुविधांचा अभाव दूर करा; १२३ पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरे द्या – आ. किशोर जोरगेवार

म्हाडा वसाहतीतील मूलभूत सुविधांचा अभाव दूर करा; १२३ पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरे द्या आ. किशोर जोरगेवार

पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले

*Jyotsna Wankhede*

चंद्रपूर येथील म्हाडा वसाहतीतील मूलभूत सुविधांचा अभाव तसेच १२३ पात्र लाभार्थ्यांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करत आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले. वसाहतीत आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्रयस्थ एजन्सीकडून पात्र लाभार्थ्यांची झालेल्या आर्थिक फसवणुकीची चौकशी करून १२३ पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरे देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

सभागृहात बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मानवी जीवनासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कोट्यवधी नागरिकांना मोफत धान्य उपलब्ध करून अन्नाची गरज पूर्ण करण्याचे मोठे कार्य केले आहे. मात्र, सर्वांना घरे देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्रात अधिक प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक आहे.

चंद्रपूर येथील म्हाडा वसाहत सुमारे ४५ वर्षांपूर्वी स्थापन झाली असली, तरी आजही तेथे वीज, रस्ते आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आवश्यक सोयी-सुविधा नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून अपेक्षित प्रमाणात लोकवस्तीही विकसित झालेली नाही. परिणाम, येथील रहिवाशांना अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

यावेळी आ. जोरगेवार यांनी म्हाडा वसाहतीच्या सर्वांगीण विकासाची मागणी केली. ४५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा फेरविचार करून शिक्षण, आरोग्य आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी नव्याने नियोजन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, म्हाडाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ एजन्सीकडून १२३ नागरिकांची फसवणूक झाल्याचा मुद्दाही आ. जोरगेवार यांनी अधिवेशनात उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित १२३ नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली. लाभार्थ्यांनी भरलेली रक्कम विचारात घेऊन उर्वरित प्रक्रिया पूर्ण करत त्यांना तातडीने घरे देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

One attachment  •  Scanned by Gmail

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page