150 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत शतकपूर्ती रक्तदान सोहळा..
पंचायत समिती बल्लारपूर द्वारे नावीन्यपूर्ण उपक्रम
श्रेयश वानखेडे:
दिनांक 28/5/2025 ला पंचायत समिती बल्लारपूर कार्यालयात 150 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शतकपूर्ती रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे मार्गदर्शक व उद्घाटक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. पुलकित सिंह(भा. प्र. से.) यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले . त्यांनी रक्तदानासंदर्भाचे महत्व यावेळी पटवून दिले व रक्तदानासाठी कर्मचारी वर्गाला आवाहन केले. तसेच स्वतः रक्तदान करून कृतीयुक्त उदाहरण उपस्थितांना दिले व शिबीराला सुरूवात झाली. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्येही चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले . सदर कार्यक्रमाचे आयोजक गटविकास अधिकारी धनंजय साळवे होते. त्याचप्रमाणे मंचावर बल्लारपूर तालुका तहसीलदार रेणुका कोकाटे तसेच इतर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी रक्तदानाची शतकपूर्ती करणारे हरीश ससनकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शतकपूर्ती रक्तदान शिबिरात पंचायत समिती कार्यक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, पदाधिकारी, नागरिक व सर्व प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक दायित्व जोपासत सदर कार्यक्रमात उत्साहाने सक्रिय उपस्थिती दर्शविली. विशेष म्हणजे महिला कर्मचारी सुद्धा या रक्तदान शिबीरात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या. पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य करून या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग दर्शवून जवळपास 50 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले .
“थेंब आहे हा रक्ताचा, आधार आहे दुसऱ्याच्या जीवनाचा” एप्रिल मे महिन्यात आरोग्य विभागात रक्ताचा तुटवडा जाणवतो. अशा वेळेस रक्ताची कमतरता भासत असल्याने, आवश्यक गरजूंना रक्त पुरवठा व्हावा हा हेतू ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात तथा सामाजिक दायित्वाच्या भावनेतून रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ , रक्त संक्रमण पेढीचे कर्मचारी व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र लामगे गट शिक्षणाधिकारी, सूत्रसंचालन नरेश बोरीकर शिक्षक गिलबिली, तर आभार श्रीमती स्वाती कुलकर्णी सहाय्यक लेखाधिकारी यांनी मानले. यावेळी पंचायत समिती क्षेत्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.