कालव्यात वाहून गेलेल्या अल्पवयीन मजुराचा मृत्यू; सेलू पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद.

Jyotsna Wankhede: सेलू पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सोनवटी येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. व्यंकटी धुमाळ यांच्या बांधकामा वर मजुरीचे काम करणारा साजिद मजीद शेख (वय १७, रा. राजमोहल्ला, सेलू) हा युवक मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास शौचासाठी सोनवटी शिवारातील निम्न दुधना प्रकल्पा च्या डाव्या कालव्याकडे गेला असता, पाणी घेण्यासाठी उतरतानाच पाय घसरून कालव्यात वाहून गेला.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस शिपाई आघाव व डुबे यांना तातडीने शोधकार्यासाठी रवाना करण्यात आले. यावेळी सोनवटी येथील पोलीस पाटील माणिक राव सोळंके, हातनुर येथील पोलीस पाटील रामचंद्र पारवे, स्थानिक ग्रामस्थ तसेच युवकाचे नातेवाईक यांनीही शोधकार्यात सहभाग घेतला. मात्र कालव्या तील पाण्याचा जोर व अंधारामुळे रात्री युवकाचा शोध लागला नाही. त्यामुळे सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले.बुधवार, दि. १८ डिसेंबर रोजी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर दुपारी साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास युवकाचा मृतदेह कालव्यात आढळून आला. या घटनेची नोंद सेलू पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे सोनवटी परिसरात हळहळ व्यक्त होत असून युवकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








