कडूबाई खरात यांनी भीमगीत गायनाने जिंकली सेलूकरांची मने.
भीम संगीत रजनीस रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
ज्योत्स्ना वानखेडे: सेलू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार ( दि.२४ ) रोजी नगर परिषदेच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मा.नगराध्यक्ष विनोद बोराडे हे होते. तर राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मंचावर प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे,भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर,शहराध्यक्ष अशोक शेलार,नगर सेवक मनिष कदम, नालंदा विपश्यना केंद्राचे करण गायकवाड (परभणी ) यांची उपस्थिती होती. वैशाली मिलिंद सावंत, पोर्णिमा जोहिरे, क्रांती फाउंडेशन व यशोधरा महिला मंडळाच्या सदस्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांचा तर नगर सेवक सुनीता सुबोध काकडे यांनी गायिका कडूबाई खरात यांचा सत्कार केला. प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांनी एकाहून एक सादर केलेल्या भीमगीत गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करत खिळवून ठेवले. सेलुकरांची मने जिंकली. कार्यक्रमात सर्वोदय नगर भीम जयंती मंडळास पोलिस प्रशासन व नगर परिषदेच्या वतीने उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुबोध काकडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्ता तांबे,मुक्तीराम वाव्हळे,गंगाधर अवचार, सुमेध आवटे, अमित धापसे,दीपक बच्छिरे, गौतम कनकुटे,विशाल धापसे, विकास धापसे, प्रवीण धापसे, सुनील धापसे, शुभम साळवे,विनोद धापसे आणि सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.