Sunday, September 20, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपूरमध्ये "ट्राफिक जामची" तातडीच्या उपाययोजनांची मागणी. - आम आदमी पार्टी, बल्लारपूर

बल्लारपूरमध्ये “ट्राफिक जामची” तातडीच्या उपाययोजनांची मागणी. – आम आदमी पार्टी, बल्लारपूर

बल्लारपूरमध्ये “ट्राफिक जामची” तातडीच्या उपाययोजनांची मागणी. – आम आदमी पार्टी, बल्लारपूर 

श्रेयश वानखेडे:

  शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी, बल्लारपूरच्या वतीने पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आणि बल्लारपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाही या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.

शहरातील वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे

बल्लारपूर शहराला सध्या कोणताही बायपास नसल्यामुळे सर्व प्रकारची जड वाहतूक शहराच्या मुख्य भागातून जाणाऱ्या महामार्गावरून होते. या महामार्गावर शाळा, व्यावसायिक प्रतिष्ठाने, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका, पोलीस स्टेशन, बस स्टँड, पेपर मिल यांसारखी महत्त्वाची ठिकाणे आहेत, ज्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

या समस्येची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

– रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण.

– पेपर मिलमध्ये येणाऱ्या शेकडो ट्रकांची रस्त्यावरच होणारी बेशिस्त पार्किंग.

– महामार्गावर मोकाट फिरणारी जनावरे, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

या सर्व समस्यांमुळे शहरात वाहतूक कोंडीची तीव्र समस्या निर्माण झाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

*प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:*

– जड वाहनांवर निर्बंध: सकाळी ७:०० ते १०:००, दुपारी २:०० ते ४:०० आणि सायंकाळी ६:०० ते ८:०० या वर्दळीच्या वेळेत शहरातून जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करावी.

– विशेष ‘पकड मोहीम’: शाळा आणि महाविद्यालयांसमोरील चौकांमध्ये वेग नियंत्रण नसलेले तरुण तसेच विनापरवाना व हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्यांवर विशेष ‘पकड मोहीम’ राबवावी.

– टोल नाक्यांवर फलक आणि पोलीस: बामणी आणि विसापूर टोल नाक्यांवर जड वाहनांना प्रतिबंध वेळेची माहिती देणारे फलक लावून वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी.

– अवैध पार्किंगवर कारवाई: शहरातील अवैध पार्किंग पूर्णपणे प्रतिबंधित करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

– मोकाट जनावरांवर नियंत्रण: महामार्गावर मोकाट जनावरे आढळल्यास तात्काळ नगरपालिकेला नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करावी. नगरपालिकेला मोकाट जनावरांच्या संदर्भात ५ दिवसांचा अल्टिमेटम दिल्याची माहितीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

– रहिवासी भागातून जड वाहतूक बंद: वस्ती विभाग आणि निवासी भागातून होणारी जड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करावी.

– कॉम्प्लेक्स आणि हॉलसाठी पार्किंग सुविधा: ‘नो पार्किंग’ असलेल्या कॉम्प्लेक्स आणि हॉलधारकांना त्यांच्या ग्राहकांसाठी पुरेशी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नगरपालिका आणि पोलिसांकडून नोटीस बजावून योग्य दंडात्मक कारवाई करावी.

शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी आशा व्यक्त केली आहे की, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बल्लारपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने योग्य ती पाऊले उचलतील.

यावेळी निवेदन देताना शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांच्यासह प्रवक्ता आसिफ शेख, शिक्षण आघाडी अध्यक्ष अजयपाल सूर्यवंशी, शर्मन बंसेल, प्रिया झमारे, स्नेहा गौर, सम्यक गायकवाड, हर्षद खंडागडे, आदित्य भागवत इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page