• रा.स्व.संघ किन्ही मंडलाचा विजयादशमी उत्सव संपन्न
Jyotsna Wankhede: आपला देश विविध गौरवशाली परंपरेने नटलेला देश आहे व होता त्याचबरोबर या देशात कितीतरी शूरवीर ऐतिहासिक महापुरुष होऊन गेले ज्यांच्या पराक्रमाने संपूर्ण जग आश्चर्यचकित होत असे, तरीसुद्धा आपला देश गुलामगिरी का गेला असा प्रश्न पडतो हा प्रश्नच संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांना सतावत होता व यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थापना झाली. आपला समाज आत्मविस्मृत स्वतःच्या स्वत्वाची जाणीव हिंदू समाज विसरला होता आणि म्हणूनच हिंदू समाज विघटित झाला व त्याचाच फायदा घेऊन इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. भविष्यातही असा प्रसंग आपल्या देशावर येऊ नये म्हणून हिंदू संघटित होणे ही आजची गरज आहे. संघ शाखेमधील छोट्या छोट्या संस्कारातून माणूस स्वयंसेवक घडत असतो व या छोट्या संस्कारांचा मोठा परिणाम आपल्याला समाजामध्ये दिसतो. समाजातील विपदेमध्ये सर्वप्रथम संघाचे स्वयंसेवक धावून जातात अनेक सेवाकार्याच्या माध्यमातून संघ समाजातील तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचला आहे. संघ शताब्दी वर्षांमध्ये कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण, स्वदेशी आणि नागरिक कर्तव्य या विषयांच्या माध्यमाने सामाजिक संतुलन साधता येईल व आपले राष्ट्र विश्वगुरु बनेल असे प्रतिपादन रा.स्व.संघ विदर्भ प्रांत शारीरिक प्रमुख श्री सुभाषजी इटनकर यांनी केले. रा.स्व.संघ बल्लारपूर तालुका किन्ही मंडल विजयादशमी उत्सवात ते प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. सदर विजयादशमी उत्सव स्थानिक मानोऱ्यातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर दि.०९ ऑक्टोबर २०२५ साय. ०५.०० वा. आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी गावातील प्रतिष्ठित शेतकरी श्री रामदासजी देवतळे, रा.स्व.संघ जिल्हा संघचालक तुषार जी देवपुजारी, तालुका संघचालक विवेक गडकर तसेच तालुका कार्यवाह वैभव चिताळे ई. मंडळी उपस्थित होते.
कार्यकमाची सुरूवात पाहुण्यांच्या हस्ते शस्त्र पूजन करून झाली. ध्वजारोहणानंतर उपस्थित स्वयंसेवकांनी सांघिक व्यायामयोग हे शारीरिक प्रात्यक्षिके सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन तालुका कार्यवाह वैभव चिताडे यांनी केले. चांगल्याचा वाईटावर आणि धर्माचा आधार्मावर विजय म्हणजे विजयादशमी होय. किन्ही मंडळातील सद्य परिस्थितीत संघाचे सुरू असलेले कार्य आणि भविष्यातील वाटचालीबाबत माहिती त्यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात दिली. पोलिस प्रशासनानेही व्यवस्थेच्या दृष्टीने उत्तम सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. नंतर प्रमुख अतिथी श्री रामदासजी देवतळे यांनी धर्मच माणसाचा स्वभाव आहे व धर्मच स्वरूप आहे, परंतु माणसाला स्वतःच्या धर्माच्या मूळ स्वरूपाचा विसर पडल्याने या विषयावर खूप कलह झाले आहे. जगामधील संप्रदायांनी धर्माला सीमाबद्ध केले व त्यामुळे वाद आला जोपर्यंत या सीमा तुटणार नाही तोपर्यंत धार्मिक कलह संपणार नाही, विविध संप्रदाय विश्वरूपी धर्मरूपी महामार्गाला जोडणारे रस्ते आहे मानवी जीवन पशुत्व आणि देवत्व यामधील द्वंद आहे, मनाच्या सामर्थ्याने आपल्यातील पशुत्वावर विजय मिळवल्यास दिव्यत्वाचा अनुभव येईल. आदर्शवत सुसंस्कृत समाज निर्माण करणे हाच धर्माचा उद्देश आहे. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
उत्सवा अगोदर गणवेशधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन मानोरा गावातून निघाले. सदर पथसंचलन जिल्हा परिषद शाळेतून शिवाजी चौक मार्गाने मानोरा गावात फिरून उत्सवस्थानी आले. मार्गात या पथसंचलनाचे गावातील नागरिकांनी उत्फूर्तपणे पुष्प वर्षाव करून स्वागत केले.
उत्सवात सांघिक गीत कृष्णा लाभे, सुभाषित हर्ष दुधबळे, अमृतवचन आराध्य पिपरे, ई. बौद्धिक कार्यक्रम सुद्धा स्वयंसेवकांनी सादर केले. विक्रम पांडे यांनी शांती मंत्र म्हणून कार्यक्रमाचा समारोप झाला. संपूर्ण उत्सवाचे संचालन बल्लारपूर तालुका शारीरिक प्रमुख मुख्यशिक्षक नयन पारधी यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता बंडूजी शेट्ये, राजू बुधलवार, रामकृष्ण उरकुडे, श्रावण सातपुते या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम केले.