Saturday, June 20, 2026
HomeChandrapurनुकसान भरपाईसाठी शास्त्रशुद्ध धोरण तयार करण्याची मागणी; भटाळी गावाच्या पुनर्वसनासह रोजगाराचा प्रश्न...
spot_img

नुकसान भरपाईसाठी शास्त्रशुद्ध धोरण तयार करण्याची मागणी; भटाळी गावाच्या पुनर्वसनासह रोजगाराचा प्रश्न केंद्रासरकार समोर मांडणार

नुकसान भरपाईसाठी शास्त्रशुद्ध धोरण तयार करण्याची मागणी; भटाळी गावाच्या पुनर्वसनासह रोजगाराचा प्रश्न केंद्रासरकार समोर मांडणार

भटाळीतील शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची ठाम भूमिका

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून वस्तुनिष्ठ अहवाल तयार होणार

दुर्गापूर रोप-वे परिसराची आ. सुधीर मुनगंटीवार व अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याकडून संयुक्त पाहणी; प्रदूषण नियंत्रणासाठी वेकोलीला सूचना



Jyotsna Wankhede: भटाळीतील कोळसा प्रदूषण, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान आणि गावाच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. वेकोलीच्या ओपन कास्ट खाणीमुळे शेतपिकांचे होत असलेले नुकसान, ब्लास्टिंगमुळे घरांना गेलेले तडे, ओव्हर बर्डनमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय व सामाजिक समस्या तसेच स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न यांची प्रत्यक्ष पाहणी करत प्रभावित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर ठोस धोरण तयार करण्याची मागणी त्यांनी केली. यासाठी भटाळी येथे अपर मुख्य सचिव (महसूल) श्री. विकास खारगे यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात अपर मुख्य सचिव (महसूल) श्री. विकास खारगे, जिल्हाधिकारी वसूमना पंत, उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, जिल्हा खनीकर्म अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार तसेच वेकोलीचे अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान आ. मुनगंटीवार म्हणाले की, भटाळी येथे ओव्हर बर्डनचा मोठा पहाड उभा राहिला आहे आणि त्याचबरोबर येथील नागरिकांच्या समस्यांचाही मोठा डोंगर निर्माण झाला आहे. ओपन कास्ट खाणीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ओव्हर बर्डनमुळे पावसाचे पाणी गावात शिरते. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच खाणीतील ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे जाऊन मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रभावित नागरिकांना योग्य नुकसान भरपाई देणे आणि भटाळी गावाचे तातडीने पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या जमिनी ओव्हर बर्डनखाली गेल्याने रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला असून वेकोलीने क्षेत्रनिहाय किती जमिनी अधिग्रहित केल्या याची संपूर्ण माहिती घेण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. तसेच ओव्हर बर्डन हटवून जमीन समतल करणे, त्या ठिकाणी वृक्षारोपण करणे आणि शेतीयोग्य जमीन तयार करण्यासाठी वेकोलीने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोळसा प्रदूषणामुळे पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता अभ्यास समितीच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध व तर्कसंगत नुकसान भरपाईचे धोरण तयार व्हावे, यासाठी शासनाने अधिकृत कार्यपद्धती विकसित करावी, अशी मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीची भरपाई देण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. जी. किशन रेड्डी यांच्या चंद्रपूर दौऱ्यादरम्यान भटाळी गावाचे पुनर्वसन, शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीची भरपाई तसेच स्थानिक रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने मांडला जाईल, असे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले. अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वाखाली तयार होणारा अहवाल राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भटाळीवासीयांनी संविधानाची प्रत भेट देऊन आ. मुनगंटीवार यांचे स्वागत केले. वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अपर मुख्य सचिव विकास खारगे हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी बोलताना अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले की, कोळसा प्रदूषणाचा पिकांवर होणारा परिणाम शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणे आवश्यक आहे. गावकरी, शेतकरी, वेकोलीचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यात येणार असून त्याआधारे शासनाला अहवाल सादर केला जाईल. कोळसा प्रदूषणामुळे पिकांचे होणारे नुकसान याबाबत सध्या कोणतेही स्पष्ट धोरण अथवा कायदेशीर तरतूद नसल्याने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या विषयासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

पाहणीदरम्यान ओव्हर बर्डनमुळे निर्माण झालेले डोंगर, शेतपिकांचे नुकसान, ब्लास्टिंगमुळे घरांना गेलेले तडे, जमिनींचे मूल्य, रोजगाराचा प्रश्न आणि प्रदूषित पाण्याच्या समस्या यांची सविस्तर नोंद घेण्यात आली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि लोकहितकारी अहवाल तयार करण्यात येईल, असे श्री. खारगे यांनी स्पष्ट केले.

प्रदूषणमुक्त दुर्गापूरसाठी पावले,
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार आणि अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी दुर्गापूर रोप-वे परिसराची संयुक्त पाहणी केली. सीएसटीपीएसला कोळशाचा पुरवठा करणाऱ्या या रोप-वेच्या बंकरमधून मोठ्या प्रमाणात कोळशाचे सूक्ष्म कण हवेत मिसळून परिसरात गंभीर प्रदूषण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रदूषणाचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होत असल्याबाबत स्थानिकांनीही यावेळी व्यथा मांडली. या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या तसेच कोळशाच्या धुळीचे उत्सर्जन रोखण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याच्या सूचना वेकोली प्रशासनाला देण्यात आल्या. नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाच्या संरक्षणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page