Tuesday, December 9, 2025
HomeLekhशिक्षण, क्रीडा, आरोग्याचा त्रिवेणी संगम म्हणजे ब्रम्हपुरी
spot_img

शिक्षण, क्रीडा, आरोग्याचा त्रिवेणी संगम म्हणजे ब्रम्हपुरी

शिक्षण, क्रीडा, आरोग्याचा त्रिवेणी संगम म्हणजे ब्रम्हपुरी 

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे नगर आज केवळ एक तालुक्याचे मुख्यालय नाही, तर ते संस्कृतीचा सुगंध, शिक्षणाचा झरा आणि प्रगतीचा दीपस्तंभ म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर तेजाने उजळत आहे. या नगरीने काळाच्या ओघात आपल्या भूमीवर परंपरा जोपासत, प्रगतिचे बीज रुजवले आहे. येथे समाजजीवनाच्या प्रत्येक अंगात एक सुसंस्कृत लय आहे.  शिक्षणाच्या गाभाऱ्यातून उगवणारे विद्यार्थी, क्रीडा मैदानावर चमकणारी प्रतिभा, आणि आरोग्याच्या सेवेत झोकून देणारे तज्ञ यांची संगत या नगरीला इतर सर्वांपेक्षा वेगळं स्थान देते.

ब्रम्हपुरी हे शहर त्या काळापासून शिक्षणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले, जेव्हा आजूबाजूच्या शहरांमध्ये महाविद्यालयांची सुविधाही नव्हती. त्या काळी शिक्षणाच्या ओढीने विद्यार्थी दूरवरून ब्रह्मपुरीकडे येत असत. खोल्यांवर भाड्याने राहून त्यांनी आपल्या भविष्याची पायाभरणी इथेच केली. आजही हे दृश्य कायम आहे. ब्रम्हपुरीत अनेक वसतिगृहांची सोय उपलब्ध झाली असली, तरी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात वसतिगृहांची संख्या अपुरी ठरते. त्यामुळे अनेक विद्यार्थी अजूनही भाड्याच्या खोल्यांमध्ये राहतात. या शहराने “शिक्षण नगरी” म्हणून जो लौकिक मिळवला, तो आजही तितकाच उज्ज्वल आहे.

क्रीडा क्षेत्रातही ब्रह्मपुरीने आपले वेगळेपण निर्माण केले आहे. शहरात नव्याने क्रीडा संकुलातील पटांगणाचे काम सुरू आहे, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणावरही खेळाडूंकरिता सराव करण्याची सुविधा उपलब्ध आहे. येथील खेळाडू केवळ स्थानिक नाहीत, तर राज्य पातळीवरही यशाचे झेंडे रोवतात. नगरपरिषदेच्या पुढाकाराने बांधण्यात आलेल्या स्विमिंग पूल मुळे या क्षेत्राला नवे बळ लाभले आहे. पूर्वी नाल्यावरील डोंगे घाटावर जीव धोक्यात घालून जलतरणाचे सराव करणारे युवक आज सुरक्षित आणि आधुनिक सुविधेत प्रशिक्षण घेत आहेत. स्पर्धकांचा जीव धोक्यात न घालता आता त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ करणारे आणि यशाचा मार्ग खुला करणारे आधुनिक जलतरण केंद्र ब्रह्मपुरीत उभे राहिले आहे.

आरोग्यसेवेच्या बाबतीतही ब्रह्मपुरी हा परिसरातील लोकांसाठी पहिली पसंती आहे. तालुक्यापुरती नव्हे तर आजूबाजूच्या गावांतून, शहरांतून आणि जिल्ह्यांतूनही रुग्ण उपचाराकरिता येथे येतात. सरकारी व खासगी अशा दोन्ही आरोग्यसेवा येथे उत्तम प्रकारे उपलब्ध आहेत. म्हणूनच ही नगरी “आरोग्याचे केंद्र” म्हणून ओळखली जाते.

या सर्व विकासाची सांगड नगरपरिषदेच्या कार्यामुळे अधिक घट्ट झाली आहे. प्रशासकीय इमारत, भव्य न्यायालयीन इमारत आणि आधुनिक नगरपरिषद भवन.  या तिन्ही वास्तूंच्या निर्मितीत आमदार विजय वडेट्टीवार यांचे योगदान अमूल्य राहिले आहे. या तिन्ही इमारती ब्रह्मपुरीच्या नागरी तेजाचे प्रतीक आहेत. तलावांचे सौंदर्यकरण, स्वच्छतेचे उपक्रम, रस्त्यांचा विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून ब्रह्मपुरीचे रूपांतर एका आधुनिक नगरीत होणार आहे.

विकासाच्या या प्रवासाला काही कटू वास्तवांनीही स्पर्श केला आहे. नगरपरिषदेमध्ये झालेल्या काही गैरप्रकारांमुळे नागरिकांच्या मनात प्रशासकीय प्रामाणिकतेबाबत प्रश्न निर्माण झाले होते. भ्रष्टाचार हा एकट्याच्या हातून घडणारा प्रकार नसतो. तो तेव्हाच फोफावतो जेव्हा जबाबदार सर्व जण मौन बाळगतात. आवाज उठवणारे कमी पडतात आणि मौन राखणाऱ्यांची संख्या वाढते तेव्हा प्रशासनावरचा विश्वास डळमळतो. पण आशा आहे की जागरूक नागरिक आणि जबाबदार प्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नाने ब्रह्मपुरी या छायेतून मुक्त राहील.

रेल्वे क्रॉसिंगवरील दीर्घकालीन समस्या दूर करण्यासाठी उड्डाणपूलाचे काम सुरू झाले आहे. रेल्वेची वारंवार होणारी वाहतूक, सतत पडणारे सिग्नल आणि त्यातून होणारी ट्रॅफिकची कोंडी; यामुळे रुग्णवाहिका, विद्यार्थी, आणि नागरिकांना भोगावा लागणारा त्रास आता लवकरच संपेल. हा पूल पूर्ण झाल्यावर ब्रह्मपुरी काहीसा मुक्त श्वास घेईल, “ट्रॅफिकमुक्त ब्रह्मपुरी” या स्वप्नाला मूर्त रूप मिळेल.

शहराचा व्याप वाढत असताना जुना बाजार चौकातील नवा बाजार मॉल हा ब्रह्मपुरीचा नवा चेहरा ठरणार आहे. बोटिंगच्या व्यवस्था असलेले तलाव, सौंदर्यपूर्ण उद्याने, आणि पर्यटनासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामुळे ब्रह्मपुरी आता “पर्यटन नकाशावर” आपले स्थान पक्के करण्यास सज्ज होत आहे.

शांततेची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुरीत अनेक नोकरदार वर्गीय व्यक्तींनी आपल्या पसंतीने स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. जरी सरकारी नियमांनुसार कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयात राहावे अशी “सेवाशर्तीतील निवास अट” असली, तरी अनेक अधिकारी, कर्मचारी ब्रह्मपुरीत वास्तव्य करून गडचिरोली, कुरखेडा, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी रोज ये-जा करतात. या निवासामुळे शहराची वसाहत, व्यापार आणि वाहतुकीचा व्याप वाढत चालला आहे. रेल्वेची सुविधा इंग्रज काळापासून लाभलेली असल्याने आजही ब्रह्मपुरी रेल्वे नकाशावर एक महत्त्वाचा ठिकाण म्हणून ओळखले जाते. भविष्यात या सुविधेत आणखी विस्तार होण्याची शक्यता आहे.

आत्मारामजी महाजन यांच्या अथक परिश्रमातून १९३१ पासून ज्या संस्थेच्या कार्याला प्रारंभ झाला ती हितकरीणी शिक्षण संस्था आत्ताची नेवजाबाई हितकरीणी शिक्षण संस्था ही ब्रह्मपुरीच्या अभिमानाचा शिरोमणी आहे. या संस्थेमधून घडलेले विद्यार्थी आज राज्याच्या आणि देशाच्या विविध महत्त्वाच्या पदांवर विराजमान आहेत. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने समाजाला ज्ञानाचा नवा दीप दिला आहे. या संस्थांमधून निर्माण झालेले अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते आणि प्रशासक हे ब्रह्मपुरीच्या शिक्षणसंपदेचे मूर्त उदाहरण आहेत.

याशिवाय हुतात्म्यांच्या स्मृतीला आदराने वंदन करणारे हुतात्मा स्मारक, नव्याने उभारण्यात आलेली संगणकाधारित ई-लायब्ररी, आणि सण-उत्सवांच्या उत्साहाने उजळणारे गणेशोत्सव हे सर्व या नगरीच्या जिवंत संस्कृतीचे प्रतीक आहेत. दिवंगत आमदार बाबा खानोरकर यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव आणि जत्रेच्या परंपरेने ब्रह्मपुरीला धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख दिली आहे. आज या उत्सवांमध्ये लाखो लोक सहभागी होतात आणि ब्रह्मपुरीच्या ओळखीला नवीन ऊर्जा मिळते.

 सर्व घटकांनी ब्रह्मपुरी केवळ एक तालुक्याचे ठिकाण न राहता एक सजीव सांस्कृतिक राजधानी बनवली आहे. येथील प्रत्येक कणात इतिहास दडलेला आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात आपल्या शहराबद्दल दृढ अभिमान आहे. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा या त्रिवेणीने ब्रह्मपुरीच्या विकासकथेला एक चिरंतन ओळख दिली आहे.

लेखन – राहुल श्रीराम भोयर, जनसेवक

ब्रम्हपुरी, तालुका ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर

 मो. / व्हॉट्सअ‍ॅप : ९४२१८१५११४

आपल्या प्रतिक्रिया माझ्या वरील व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर नक्की पाठवा.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page