सेलू नगर परिषद निवडणूक मतदान : कार्यकर्त्यांकडून आपलाच विजय. दावे- प्रतिदावे सुरु.
प्रभाग 3 मध्ये सर्वाधिक तर प्रभाग 8 मध्ये कमी मतदान झाले.

Jyotsna Wankhede: सेलू नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. ४४ हजार ९९३ मतदारांपैकी ३० हजार ४६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६७.७१ टक्के मतदान झाले. यामध्ये काही ठिकाणी मतदान उत्स्फूर्तपणे झाले; पण काही ठिकाणी मात्र मतदान टक्केवारी घटल्याचे आकडेवारी वरून पुढे आले. यात प्रभाग क्रमांक तीनमध्ये सर्वाधिक, तर सर्वांत कमी प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान झाल्याचे समोर आले.नगराध्यक्ष व 26 सदस्य निवडीकरिता सेलू नगर परिषदेत मंगळवारी 13 प्रभागांत मतदान झाले आहे. येथे प्रभाग 3 मध्ये 2 हजार 879 पैकी 1 हजार 990 मतदारांनी मतदान केले. येथे सर्वाधिक ७४.२८, अशी टक्केवारी राहिली, तर प्रभाग क्रमाक ८ मध्ये 3 हजार 570 पैकी 2 हजार 144 मतदारांनी मतदान केले. येथे सर्वात कमी प्रतिसाद मिळाला. येथे 60.05 अशी टक्केवारी राहिली आहे. प्रभाग 7,10,11,12,13 या ठिकाणची आकडेवारी ही ७१ टक्क्यांपेक्षा अधिक होती, तर इतर प्रभागात मात्र मतदान टक्केवारी घटली आहे. घटलेली व वाढलेली मतदान टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हे निकालानंतरच पुढे येईल.