वेदांचे पालन करणारा मनुष्य आजीवन सुरक्षित राहतो – स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज.
श्रीमद् भागवत महापुराण कथेला भाविकांची मोठी उपस्थिती.
Jyotsna Wankhede: दि.27 वेदांचे पालन व रक्षण करणारा मनुष्य आयुष्यभर सुरक्षित राहू शकतो, असे प्रतिपादन स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी केले.
मराठवाडा व विदर्भातील भाविकांच्या वतीने श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी धाम येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत महापुराण कथेच्या दुसर्या दिवशी म्हणजे शनिवार 27 डिसेंबर रोजी कथा सूत्र प्रतिपादन करताना स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी वेदांचे महत्त्व विशद केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संबीत पात्रा व ओडिशा भाजपचे कोषाध्यक्ष अजय अग्रवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न झाली.प्रवचनात स्वामीजींनी कौरव-पांडवांच्या वंशाचा संदर्भ देत प्राचीन काळात अस्त्रांचा प्रयोग मंत्रांच्या साहाय्याने कसा केला जात असे, यावर प्रकाश टाकला. वेदांच्या माध्यमातूनच भारतीय ऋषी-मुनींच्या सामर्थ्याची प्रचिती येते, असे त्यांनी नमूद केले. जे काही इष्ट आहे, ते सुंदरच वाटले पाहिजे, असा विचारही त्यांनी मांडला.
अध्यात्म व ईश्वरी चिंतनावर भाष्य करताना स्वामीजी म्हणाले की, प्रत्येकाने प्रभूच्या चरणकमलांचे चिंतन केले पाहिजे. चित्तात कोमलता नसेल तर अध्यात्म घडत नाही आणि अशा कोमल चित्ताशिवाय भगवंताचे आगमनही होत नाही. प्रभूच्या करकमलांतील चक्र व आयुधांचे चिंतन केल्यास आयुष्यात कोणताही अनर्थ होत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भगवंताच्या मुखारविंदा वरील अनुकंपा व नेत्रांतील अखंड करुणा भाविकांना शांती प्रदान करते. याच अनुकंपेमुळे जगन्नाथ भगवान संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करतात, असे त्यांनी सांगितले. संतांच्या सान्निध्यात चिंतन परमात्म्याशी एकरूप झाले की, मनुष्याचे व्यक्तिमत्त्व खर्या अर्थाने बदलते, असेही त्यांनी नमूद केले.यावेळी खासदार संबीत पात्रा म्हणाले, ज्याच्या जीवनात संघर्ष नाही, ते जीवन खरे जीवनच नाही. आयुष्याच्या अखेरीस आपल्या जीवनाचे पुस्तक लिहिले गेले, तर ते केवळ दोन पानांचे नसावे, तर संघर्षाने समृद्ध असावे, असे प्रतिपादन खासदार संबीत पात्रा यांनी केले. जीवनात संघर्ष करत, अनेक अडचणींना सामोरे जात आणि भगवंताचे स्मरण ठेवून निरंतर कार्य केल्यासच जीवनगाथा महान ठरते, असे ते म्हणाले. पात्रा पुढे म्हणाले की, 21 व्या शतकातील महामंत्र म्हणजे अयोध्येतील भगवान श्रीराम जन्मस्थळी उभारलेले भव्य राम मंदिर होय. या महायज्ञात स्वामी गोविंद देव गिरीजी महाराजांचा सक्रिय सहभाग सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन बाहेती यांनी केले. या सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान, बालियापांडा येथील इंद्रद्युम्ननगरी येथे 1 जानेवारी 2026 पर्यंत चालणार्या या कथा सोहळ्याचे आयोजन राधेश्याम चांडक (बुलडाणा), नंदकिशोर झंवर (रिसोड), डॉ. विनोद मंत्री (परभणी) आणि नंदकिशोर बाहेती (सेलू) व त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.