Tuesday, July 28, 2026
HomeChandrapur‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा
spot_img

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा

चंद्रपूर( जीमाका): आरोग्य हा विषय नागरिकांच्या केंद्रस्थानी यावा, याबाबत चर्चा व्हावी तसेच नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा  घेण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, माता बाल संगोपन अधिकारी मोहनीश गिरी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिंह म्हणाले, 1 एप्रिल 2026 पासून हे अभियान राबविण्यात येत असून वर्षभर ते सुरू राहणार आहे. आरोग्याच्या बाबतीत नागरिकांमध्ये सजगता निर्माण होण्यासाठी हा अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान’ राबविण्यात आले. त्याच धर्तीवर आता आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन ‘माझं गाव, आरोग्य संपन्न्‍ गाव’ अभियान हाती घेतले आहे. गावस्तरावरील सर्व यंत्रणांचा तसेच लोकांचा सहभाग यात अतिशय महत्वाचा आहे. अभियानाची उद्दिष्टपुर्ती आणि प्रभावी अंमलबजावणी लोकसहभागातूनच पूर्ण होणार असून त्यांच्याच सहकार्याने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा आपण आरोग्य संपन्न करू, अशी अपेक्षा श्री. सिंह यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कटारे म्हणाले, आरोग्याबाबत जनतेमध्ये चर्चा होणे गरजेचे झाले आहे. हा एक नियमित उपक्रम असला तरी लोकसहभाग आणि आंतरविभागीय समन्वय आवश्यक आहे. या मोहिमेमध्ये संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार, जलजन्य आजार, किटकजन्य आजार याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावयाची आहे. यात लोकांचा सहभाग, इतर विभागाशी प्रशासकीय समन्वय, शेवटच्या घटकांपर्यंत नवीन उपक्रम आणि परिणामकारक मुल्यमापन हे घटक महत्वाचे आहेत.

जिल्हास्तरावर दोन महिन्यातून एकदा तर ग्राम आणि तालुकास्तरावर महिन्यातून एकदा याचा आढावा घेण्यात येईल. या अभियानांतर्गत राज्यस्तरावर पाच कोटी, विभागीय स्तरावर तीन कोटी तर जिल्हास्तरावर दोन कोटींचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुराव्यासह यात मुल्यमापन होणार असल्याचे डॉ. कटारे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन माता बाल संगोपन अधिकारी मोहनीश गिरी यांनी केले. कार्यक्रमाला सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी, तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page