आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींना दिलासा
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; सकारात्मक निर्णय
बियाणे प्रमाणीकरण प्रणाली, थांबा यंत्र, परवाना प्रक्रिया व दंडात्मक कारवाईबाबत निर्देश

Jyotsna Wankhede : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे खत, बियाणे आणि कीटकनाशके विक्री व्यवसायातील प्रलंबित अडचणी मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध समस्या, परवाना प्रक्रिया, बियाणे प्रमाणीकरण व मागोवा प्रणालीतील तांत्रिक अडचणी, थांबा यंत्र वापरातील अडथळे तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत सर्व बाबींवर सकारात्मक निर्णय घेत संबंधित विभागांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
बैठकीस विजय मांढरे कृषी आयुक्त पुणे, श्री बोरकर संचालक गुण नियंत्रण व निविष्ठा पुणे, प्रवीण देशमुख चीफ क्वालिटी कंट्रोल पुणे, रवी निगुडे किसान मोर्चा, बंडू गौरकार किसान मोर्चा, मनमोहन कलंत्री राष्ट्रीय अध्यक्ष, विनोद तराळ महाराष्ट्र अध्यक्ष माफदा, प्रशांत गुंडावार, पकज सारडा, प्रतीक हिरडे, अभिजित खटी कृषी विभागातील अधिकारी,इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील प्रलंबित अडचणींबाबत ठाम भूमिका मांडत शेतकरी आणि विक्रेते या दोघांनाही दिलासा देणारे निर्णय घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांच्या उपस्थितीत कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील विद्यमान अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. परवाना देणे, नूतनीकरण प्रक्रिया व त्यातील अटी यासंदर्भात प्रतिनिधींनी विविध मुद्दे मांडले. निविष्ठांच्या वितरण व्यवस्थेत येणारे अडथळे, संबंधित कायदे व नियमांमधील त्रुटी तसेच त्यामधील आवश्यक सुधारणा यावर सखोल चर्चा झाली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार खत, बियाणे व कीटकनाशके वेळेत आणि सुलभरीत्या उपलब्ध होणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे ठामपणे नमूद केले. त्यांनी बियाणे प्रमाणीकरण, मागोवा व साठा व्यवस्थापन प्रणालीतील तांत्रिक अडचणी, थांबा यंत्र वापरातील अडथळे तसेच पीक पद्धतीतील बदलांचा निविष्ठा व्यवस्थापनावर होणारा परिणाम याकडे विशेष लक्ष वेधले. या सर्व समस्यांमुळे शेतकरी आणि विक्रेते दोघांनाही अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने विविध तांत्रिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणी सातत्याने मांडत शेतकऱ्यांपर्यंत योग्य दर्जाच्या निविष्ठा वेळेत पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. तांत्रिक त्रुटींमुळे विक्रेत्यांना अन्यायकारक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू नये, तसेच परवाना प्रक्रियेत सुलभता आणणे गरजेचे असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी ठामपणे मांडले.
बैठकीत कृषी आयुक्तालयाने सर्व प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करावा, परवाना प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी ठोस प्रस्ताव तयार करावा तसेच संबंधित कायदे व नियमांमध्ये आवश्यक सुधारणा सुचवून शासनास प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. निविष्ठा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचेही ठरविण्यात आले.
बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तांत्रिक त्रुटींमुळे कृषी निविष्ठा विक्रेते आणि शेतकऱ्यांना अन्याय सहन करावा लागू नये, तसेच प्रणाली अधिक सुलभ व पारदर्शक व्हावी, अशी ठाम मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर बियाणे प्रमाणीकरण प्रणाली व थांबा यंत्र संदर्भातील तांत्रिक अडचणी १५ दिवसांच्या आत दूर करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित घटकांना प्रशिक्षण देऊन प्रणाली अधिक अद्ययावत व सुसंगत करण्याबाबतही कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. सद्यस्थितीत उद्भवलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर सुधारणा पूर्ण होईपर्यंत निलंबन किंवा दंडात्मक कारवाई न करण्याबाबत तात्पुरती सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर काही निर्णय १ मेपासून लागू करण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले. केंद्र सरकारच्या निर्णयांशी सुसंगत असे महाराष्ट्र शासनाचे निर्णयही घेण्यात यावेत,अशी बैठकीत आ.मुनगंटीवार यांनी मागणी मंत्री यावरही सहमती दर्शविण्यात आली.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व बाबींवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणी सोडवून शेतकरी व विक्रेते या दोघांनाही दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पुढील बैठकीत प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित अडचणींवर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर माफदा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले. कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या पुढाकारामुळे विक्रेते आणि शेतकरी या दोघांनाही मोठा दिलासा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.








