शिक्षकांवर अन्याय करणारे शासन निर्णय रद्द करा मार्च महिन्याचे वेतन तात्काळ करा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली धरणे / निदर्शने आंदोलन
ज्योत्स्ना वानखेडे: मार्च पेड इन एप्रिल चे वेतन तात्काळ अदा करण्यात यावे व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अन्यायकारक असे दि. १ एप्रिल २०२६, दि. २ एप्रिल २०२६ व, दि. २ एप्रिल २०२६ हे तीन शासन निर्णय रद्द करण्यात यावे, या प्रमुख दोन मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे / निदर्शने आंदोलन दि. २० एप्रिल २०२६ रोजी शिक्षण उपसंचालक नागपूर यांचे कार्यालयासमोर करण्यात आले.
राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्च पेड इन एप्रिल चे वेतन अजून झालेले नाही. वेतन अदा करण्याबाबत अनेक अडचणी येत असल्याने शिक्षकांचे पगार थांबले आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. माशाअ २०२५/प्र.क्र.५२/एसएम-४, दि. १ एप्रिल २०२६, माशाअ २०२४/प्र.क्र. ई-१३१२८८३/एसएम-४, दि. २ एप्रिल २०२६ व माशाअ २०२४/प्र.क्र. ई-१३१२९६३/एसएम-४, दि. २ एप्रिल २०२६ नुसार कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या तथापि मुल्यांकनाच्या व अनुदानाच्या निकषांमध्ये काही पात्र व अपात्र झालेल्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा / तुकड्या बंद करून स्वयंशासित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यामुळे गेल्या १५ ते २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे सदर शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यासाठी धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनातील प्रमुख मागण्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोबतच राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत विषयांवर संबोधित केले. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे विभागातील अनेक प्रकरणे दीर्घ काळापासून पेंडिग असल्याने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आल्याचेही यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.
सोबतच आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांनीही मार्गदर्शन केले.
धरणे आंदोलनातील मागण्यांचे निवेदन विभागीय उपसंचालक नागपूर यांच्यामार्फत शासनास पाठविण्यात आले.
या धरणे / निदर्शने आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, विगागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, महामंडळ उपाध्यक्ष जगदीश जुनघरी, नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, महानगर कार्यवाह अविनाश बडे, भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर अध्यक्ष मोहम्मद शकील, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे व शिक्षक – कर्मचारी, पदाधिकारी, सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन शालार्थ आयडी मंजूर
बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले वर्धा जिल्ह्यातील दोन शालार्थ आयडी प्रकरणे आंदोलनादरम्यान निकाली काढण्यात आले. यात अनुकंपा प्रकरणातील प्रथमेश साटोटे (कनिष्ठ लिपीक, जगजीवनराम माध्यमिक विद्यालय, रामनगर, वर्धा) व कैलाश कोडापे (शिपाई सेवक, यशवंत हायस्कूल, अंदोरी, ता. देवळी, वर्धा) यांना शालार्थ आयडी पत्र आंदोलनानंतर देण्यात आले.