रात्रीच्या अंधारात ‘कोळसा तस्करीचा खेळ’: सास्ती– पोवणी–साखरी खाणींमधून स्टीम कोलच्या तस्करीचे आरोप
ज्योत्स्ना वानखेडे:
बल्लारपूर वेकोलिच्या क्षेत्रातील सास्ती, पोवणी आणि साखरी खाण परिसरातून रात्रीच्या वेळी स्टीम कोलची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री 11 ते पहाटे 4 वाजेदरम्यान डंपर आणि अवजड ट्रकमधून उच्च दर्जाचा कोळसा अवैधरित्या बाहेर नेला जात आहे.
*कसा सुरू आहे हा ‘तस्करीचा खेळ’?*
1. *डीओ घोटाळा:* कचरा माल किंवा राखेच्या डीओ परमिटवर प्रत्यक्षात स्टीम कोल भरला जात असल्याचा आरोप आहे.
2. *तेलंगणा-हैदराबाद कनेक्शन:* तस्करी केलेला कोळसा तेलंगाणा आणि हैदराबादमधील वीटभट्ट्यांना चढ्या भावाने विकला जातो. सीमा जवळ असल्याने वे-ब्रिजवरील पर्ची रद्द केली जाते.
3. *‘सेटिंग’चा आरोप:* खाण कामगारांपासून ते वाहतूकदारांपर्यंत संगनमत असल्याची चर्चा आहे. आरोप आहे की, काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने रात्री कोणतीही अडचण न येता ट्रक थेट खाणीतून बाहेर पडतात.
*स्थानिक ट्रकचालकांमध्ये संताप*
सामान्य ट्रक मालकांना दिवसा टोकनसाठी तासनतास रांगेत थांबावे लागते, तर दुसरीकडे तस्करीचे ट्रक रात्री बिनधास्तपणे लोड होऊन जातात, अशी तक्रार ट्रकचालकांनी केली आहे. यामुळे वेकोलिला दररोज लाखोंचे नुकसान सोसावे लागत आहे.
*कारवाईची मागणी*
या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. नागरिकांनी वेकोलि व्यवस्थापन, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि खनिकर्म विभागाकडे रात्रीची गस्त वाढवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.