आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते राजस्थानमधील ‘वृक्ष मित्र सन्मान समारोह २०२६’मध्ये होणार पुरस्कार वितरण
जयपूर येथे प्रतिष्ठित सोहळ्यात आ. मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती
अभिनेत्री रविना टंडन यांचीही राहणार विशेष उपस्थिती; पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि हरित भारताच्या संकल्पनेला मिळणार नवी दिशा

Jyotsna Wankhede : पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि हरित विकासाच्या संकल्पनांना सातत्याने बळ देणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार हे राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित ‘वृक्ष मित्र सन्मान समारोह २०२६’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. श्री कल्पतरू संस्थान, जयपूर (राजस्थान) यांच्या वतीने दि. ६ मे २०२६ रोजी जयपूर येथील हॉटेल क्लार्क्स अमेर येथे हा भव्य आणि दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.
देशभरात पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि हरित अभियानात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात येणार असून, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.या भव्य सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन यांचीही विशेष उपस्थिती राहणार असून, पर्यावरण संवर्धन आणि हरित भारताच्या संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
देशभरात वृक्ष संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘श्री कल्पतरू संस्थान’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३१ वर्षांपासून ही संस्था पर्यावरण रक्षण, वृक्षलागवड आणि जनजागृतीचे कार्य देशभरात करीत आहे. २२ राज्ये आणि १३ देशांपर्यंत पोहोचलेल्या या संस्थेने आतापर्यंत एक कोटींहून अधिक वृक्षलागवड पूर्ण केली असून, पाच कोटी वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य संस्थेने निश्चित केले आहे. १० हजारांहून अधिक स्वयंसेवक या हरित अभियानाशी जोडले गेले आहेत.
पर्यावरण, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री असताना ५० कोटी वृक्ष लागवड, वनसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविले होते. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजस्थानमध्ये आयोजित हा सन्मान सोहळा पर्यावरण संवर्धनाच्या राष्ट्रीय चळवळीला अधिक बळ देणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.








