*हवेली गार्डन परिसरात चक्क नालीत घुसली स्कूल बस!*
*निकृष्ट व चुकीच्या नाली बांधकामामुळे अपघात; संबंधित कंत्राटदार व पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
हवेली गार्डन परिसरात नुकत्याच करण्यात आलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीच्या चुकीच्या बांधकामाचा गंभीर प्रकार समोर आला असून, आज दि. १० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास एका खासगी शाळेची स्कूल बस चक्क याच नालीत जाऊन अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वेळीच उपाययोजना करण्यात आली असती तर ही घटना टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
हवेली गार्डन परिसरात काही दिवसांपूर्वी सांडपाणी वाहून नेण्यासाठी नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, सदर नालीचे बांधकाम करताना ती पुढील नालीला योग्य पद्धतीने जोडण्यात न आल्याने नाली मधेच ‘एंड’ करून ठेवण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, नालीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही त्याठिकाणी योग्य ती सुरक्षा व्यवस्था अथवा इशारा फलक लावण्यात आला नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आज दुपारी एका खासगी शाळेची स्कूल बस या ठिकाणाहून जात असताना चालकाचा अंदाज चुकल्याने बस थेट नालीत घुसली. या घटनेमुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली. बसमध्ये विद्यार्थी असल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.
या चुकीच्या नाली बांधकामाबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रवि जोगी यांनी यापूर्वीच संबंधित कंत्राटदार, पालिकेचे अधिकारी तसेच स्थानिक नगरसेवकांना वारंवार सूचना व तक्रारी केल्या होत्या. मात्र, संबंधितांनी वेळीच दखल घेऊन आवश्यक उपाययोजना न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी आज प्रत्यक्ष अपघाताची घटना घडली.
‘नालीचे बांधकाम करताना नियम व सुरक्षेच्या बाबींची काळजी घेतली असती, तसेच तक्रारींची वेळीच दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती,’ असा आरोप रवि जोगी यांनी केला आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित कंत्राटदार तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रवि जोगी यांनी केली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडून एखाद्या नागरिकाच्या अथवा विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी सदर नालीची तातडीने दुरुस्ती करून योग्य पद्धतीने जोडणी करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.