राजर्षी शाहू महाराजांचे विचार समाजाला नवी दिशा देणारे – आ. किशोर जोरगेवार
भाजप चंद्रपूर महानगरतर्फे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात
*Jyotsna Wankhede*
सामाजिक समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाची पायाभरणी करणारे राजर्षी शाहू महाराज हे केवळ एका संस्थानाचे राजे नव्हते, तर आधुनिक भारतातील सामाजिक परिवर्तनाचे महान शिल्पकार होते. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचविणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने महानगर कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरुनुले, सवित दंढारे, अजय जयस्वाल, वंदना हातगावकर, नगर सेवक जितेश कुळमेथे, आशिष मासिरकर, नगर सेवक नितेश गवळी, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे,जन प्रलय मशाखेत्री, राजकुमार अक्कापल्लीवार, कार्तिक बोरेवार, निलिमा वनकर, रंजन ठाकुर, प्रविण गिलबिले, ईश्वर विरुटकर.भाग्यश्री येरणे, विनोद अनंतवार, दिनकर सोमलकर, हर्षदा गर्गेलवार, आकाश जुनमलवार, मनिषा पडगेलवार हिमांशु पाल आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक न्याय, मागासवर्गीयांसाठी आरक्षण, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य भारतीय इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. त्यांनी समाजातील वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे आजही त्यांचे कार्य सामाजिक परिवर्तनाचा आदर्श मानले जाते.
ते पुढे म्हणाले की, समता, बंधुता आणि सर्वसमावेशक विकास हीच राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची खरी ओळख आहे. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा अभ्यास करून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी मांडलेले शिक्षण, समान संधी आणि सामाजिक न्यायाचे तत्त्व आजही तितकेच समर्पक असून समाजाला नवी दिशा देणारे आहे. त्यांच्या विचारांचे संवर्धन आणि आचरण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही आ. जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.