Wednesday, July 1, 2026
HomeChandrapurमोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! –...
spot_img

मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आ. सुधीर मुनगंटीवार

मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आ. सुधीर मुनगंटीवार

आ.मुनगंटीवार यांच्या हस्ते मारोडा येथील नूतन सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण; विद्यार्थ्यांना मोठे ध्येय ठेवण्याचा प्रेरणादायी संदेश

वाचनालयांच्या माध्यमातून ज्ञानसमृद्ध, संस्कारी आणि कर्तृत्ववान पिढी घडविण्याचा संकल्प


*Jyotsna Wankhede* : मनात कधीही छोटी स्वप्ने बाळगू नका. ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर स्वतःचे, गावाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करा. मारोडा या भूमीने कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्यासारखे नेतृत्व दिले आहे. याच वाचनालयातून उद्याचे अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रशासक आणि महाराष्ट्राचा गौरव वाढविणारे विद्यार्थी घडले पाहिजेत,असे प्रेरणादायी आवाहन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

खनिज विकास निधी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या मारोडा येथील नूतन सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.यावेळी कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मटाले, उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजित आमले, सरपंच भिकारू शेंडे, सरपंच प्रियंका नर्मलवार, चंदू मार्गोनवार, डॉ. मंगेश गुलवाडे, बंडू नर्मलवार, नामदेव गुरुनुले, प्रभाकर भोयर, राकेश ठाकरे, चंदू मुद्दमवार, रुपेश निकोडे तसेच मारोडावासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले की, १९९५ मध्ये प्रथमच आमदार झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभारणार, असा संकल्प केला होता. त्या संकल्पाची पूर्तता करत चंद्रपूर, मुल, पोंभूर्णा, बल्लारपूर, कोरपणा यांसह अनेक ठिकाणी वाचनालये उभारण्यात आली. तसेच जिल्ह्यातील ८२५ ग्रामपंचायतींमध्ये कृषी वाचनालये सुरू करून शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचविण्याचे काम करण्यात आले.

पुढे म्हणाले, शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून संस्कारी समाज घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांनी दिलेल्या शिक्षणाच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही आजची गरज आहे. गरीबीत जन्म घेणे दोष नाही; मात्र कर्तृत्व, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न न करणे हीच खरी चूक असल्याचे आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मारोडा, राजोली, पडोली, विसापूर, कोठारी यांच्यासह जिल्ह्यातील २२ वाचनालयांसाठी प्रत्येकी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच मूल–सोमनाथ मार्गावर पॉलिटेक्निक महाविद्यालय, १०० एकर परिसरात कृषी महाविद्यालय आणि अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम सुरू असल्याची आ.मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिर परिसराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याचे, मारोडा येथील महादेव मंदिराचे काम पूर्णत्वास नेण्याचे तसेच मारोडा गावासाठी आकर्षक स्वागतद्वार उभारण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुढील आठवड्यात विधानसभेत अशासकीय विधेयक मांडणार असून, आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून २० टक्के रक्कम त्यांच्या पालकांना देण्याची तरतूद त्यात प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहितीही आ. मुनगंटीवार यांनी दिली.

मारोड्याच्या विकासामागे आ.मुनगंटीवार यांचा पाठपुरावा
प्रास्ताविक करताना सरपंच भिकारू शेंडे यांनी सांगितले, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खनिज विकास निधीतून सुसज्ज वाचनालयाची उभारणी शक्य झाली. तसेच सोमनाथ देवस्थानाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून अनेक विकासकामे पूर्ण झाली असून, त्यांच्या प्रयत्नांतून सोमनाथ देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. पर्यटन सफारी गेटमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यावेळी शासकीय सेवेत निवड झालेल्या अजय कांबळे, नयना सुधाकर मडावी, विवेक भडके, हंसराज वैरागडे, जय गुरनुले, मोहित सुखदेव मोहुर्ले, नूतन शेंडे आणि आदित्य मोहुर्ले या गुणवंतांचा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page