Sunday, August 16, 2026
spot_img
HomeChandrapurसफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न अधिवेशनात; आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाचे वेधले लक्ष

सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न अधिवेशनात; आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाचे वेधले लक्ष

सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न अधिवेशनात; आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाचे वेधले लक्ष

उपोषणकर्त्यांना दिलेला शब्द पाळला; लाड-पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे वारसांना तात्काळ सेवेत सामावून घेण्याची मागणी

*Jyotsna Wankhede*:
चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कामगार (सफाई कुली/रेजा) यांच्या वारसांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची दखल घेत काही दिवसांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले होते. दिलेला शब्द पाळत आज त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.

अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी अनेक वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून शहराची स्वच्छता राखली. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याबाबत मनपा प्रशासनाकडून सातत्याने अन्याय होत असून शासन निर्णय आणि न्यायालयीन आदेशांनाही हरताळ फासला जात आहे.

ते यावेळी  म्हणाले की, लाड-पागे समितीच्या शिफारशी तसेच २४ फेब्रुवारी २०२३, १३ ऑक्टोबर २०२४ आणि २८ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयांनुसार वारसांना सेवेत सामावून घेण्याची स्पष्ट तरतूद आहे. एवढेच नव्हे तर उच्च न्यायालयानेही याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मनपा प्रशासनाने वारसांकडून अर्ज मागवून प्रक्रिया सुरू केली होती; मात्र आता “१९७५ ते २०२३ या कालावधीत अर्ज आले नाहीत” असे कारण देत नियुक्ती नाकारण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. हा प्रकार बेकायदेशीर असून कामगारांच्या अधिकारांवर घाला घालणारा आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात शासनाकडे मागणी केली की, वारसांना देण्यात आलेल्या सर्व बेकायदेशीर नोटिसा तात्काळ रद्द करण्यात याव्यात. शासन निर्णय आणि न्यायालयीन आदेशांनुसार सफाई कुली/रेजा यांना सफाई कामगारांचे सर्व लाभ लागू करण्यात यावेत. लाड-पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पात्र वारसांना तातडीने सेवेत सामावून घेण्यात यावे.

तसेच ४५ वर्षांच्या वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर असलेल्या वारसांना प्राधान्याने नियुक्ती द्यावी, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व इच्छेनुसार वर्ग-३ पदांवर नियुक्तीची संधी उपलब्ध करून द्यावी, नियुक्ती प्रक्रियेत जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व जलद होण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

उपोषणकर्त्यांना दिलेला शब्द पाळत हा विषय विधानसभेत ठामपणे मांडल्याबद्दल सफाई कामगारांचे वारस व आंदोलनकर्त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे. 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page