Friday, July 17, 2026
HomeChandrapurआमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने कंत्राटी सफाई कामगारांचा वेतनाचा प्रश्न मार्गी.
spot_img

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने कंत्राटी सफाई कामगारांचा वेतनाचा प्रश्न मार्गी.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने कंत्राटी सफाई कामगारांचा वेतनाचा प्रश्न मार्गी.

थकीत वेतन सोमवारी देणार; बोनसही मंजूर

*Jyotsna Wankhede* : थकीत वेतन अदा करावे तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, या मागण्यांसाठी चंद्रपूर महानगरपालिकेसमोर कंत्राटी सफाई कामगारांनी कष्टकरी जनसंघ यांच्या नेतृत्वात मागील ७ तारखेपासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शुक्रवारी आंदोलनस्थळी भेट देत कामगारांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मनपा आयुक्त अनुकुरी नरेश यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कामगारांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याच्या सूचना दिल्या. आमदारांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, सोमवारी थकीत वेतन अदा करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने मान्य केले आहे.

आंदोलनादरम्यान कामगारांनी अनेक दिवसांपासून वेतन न मिळाल्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासमोर मांडल्या. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली. यावर आमदार जोरगेवार यांनी तातडीने मनपा आयुक्त अनुकुरी नरेश यांच्याशी संपर्क साधत या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.

आयुक्तांनी तात्काळ संबंधित वेतनाची फाईल मागवून घेत सोमवारी कामगारांचे थकीत वेतन अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच कंत्राटी सफाई कामगारांना बोनस देण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार असून, त्यांना वेळेवर वेतन आणि त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून, त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू, अशी ग्वाही त्यांनी कामगारांना दिली.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्तक्षेपामुळे थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागल्याने आंदोलनकर्त्या कामगारांनी समाधान व्यक्त केले. वेतन आणि बोनसबाबत सकारात्मक निर्णय झाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बॉक्स

कामगारांना पूर्ववत सेवेत घेण्याबाबत लवकरच बैठक

कंत्राटी सफाई कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याच्या मागणीचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी दखल घेतली. यासंदर्भात मनपा आयुक्त अनुकुरी नरेश यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत कामगारांच्या पुनर्नियुक्तीबाबत लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच  बैठक घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page