Monday, September 14, 2026
spot_img
HomeChandrapurचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रभावी मांडणी; पाच महत्त्वाच्या विषयांवर...

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रभावी मांडणी; पाच महत्त्वाच्या विषयांवर शासनाची सकारात्मक भूमिका

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रभावी मांडणी; पाच महत्त्वाच्या विषयांवर शासनाची सकारात्मक भूमिका

१,७४० कृषी पंपांना वीजजोडणी, विसापूर येथील ३१.३५ हेक्टर जागा, ८०० मेगावॅट संचासह महत्त्वाच्या विषयांना मिळाली गती

विदर्भ वीज प्रोत्साहन योजना, महाऔष्णिक वसाहतीच्या विकासकामांना चालना; संबंधित विभागांना तातडीच्या कार्यवाहीसाठी राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश



*Jyotsna Wankhede* : चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित पाच महत्त्वाच्या विषयांवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या पुढाकाराने मुंबई येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीत मा. राज्यमंत्री सौ. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम – सार्वजनिक उपक्रम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत राज्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे १,७४० कृषी पंपांना वीजजोडणी, बल्लारपूर येथील विसापूरच्या ३१.३५ हेक्टर जागेवर ESIC रुग्णालय, SRPF वसाहत व महिला सहकारी औद्योगिक वसाहत उभारण्याचा मार्ग, स्वतंत्र विदर्भ क्षेत्र वीज प्रोत्साहन योजना, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील वसाहतीच्या विकासकामांना गती तसेच ८०० मेगावॅट संच कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे.

या बैठकीस श्रीमती अभिलाषा झा ESIC क्षेत्रीय कार्यालय मुंबई,असिस्टंट डायरेक्टर जितेंद्र खैरनार, संचालक डॉक्टर अशोक थोरात,श्रीमती स्वाती कारले ॲडिशनल कलेक्टर MIDC, श्री संदीप हाके चीफ इंजिनीयर MSETCL मुंबई, दूरदर्शन प्रणाली द्वारे जिल्हाधिकारी चंद्रपूर वसुमना पंत,तहसीलदार चंद्रपूर,चीफ इंजिनियर नागपूर आदींची उपस्थिती होती.

बैठकीच्या प्रारंभी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या सर्व विषयांची ठाम मांडणी करत प्रलंबित बाबींवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.बैठकीत विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील १,७४० कृषी पंपांना तातडीने वीजजोडणी देण्याचा मुद्दा आ. मुनगंटीवार यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत बैठकीत मांडला. त्यावर येत्या १० दिवसांत सौर ऊर्जेच्या अनुषंगाने तपासणी करून आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

बल्लारपूर तालुक्यातील मौजा विसापूर येथील ३१.३५ हेक्टर बंद पॉवर हाऊसची जागा ESIC रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बल (SRPF) वसाहत तसेच महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

स्वतंत्र विदर्भ क्षेत्र वीज प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पातील ₹५५० कोटींच्या निधीचा प्रभावी वापर करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती सखोल अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ८०० मेगावॅट संच कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठविण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच महाऔष्णिक वसाहतीतील रस्ते, नाल्या, गाळे, निवासस्थाने, स्विमिंग पूल व जिमसाठी निधी उपलब्ध करून विकासकामे गतीने पूर्ण करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला. वसाहतीतील ५३० इमारतींपैकी १४३ इमारतींचे नूतनीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

चर्चेअंती मा. राज्यमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून प्रलंबित बाबी विहित कालमर्यादेत पूर्ण कराव्यात, प्रत्येक विषयाचा नियमित आढावा घ्यावा आणि प्रगती अहवाल शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट आणि ठोस निर्देश दिले.

यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित प्रत्येक प्रश्न शासन स्तरावर सातत्याने आणि ठामपणे मांडला जाईल, अशी ग्वाही दिली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेला विषय प्रलंबित राहू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शेतकरी, उद्योग, आरोग्य, रोजगार, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये चंद्रपूरला अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत जिल्हा बनविण्यासाठी शासनाकडून आवश्यक असलेला प्रत्येक निर्णय करून घेण्यासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “चंद्रपूरच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हीच माझी सर्वोच्च जबाबदारी असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जनहिताशी संबंधित प्रत्येक प्रश्न मार्गी लागेपर्यंत माझा पाठपुरावा अविरत सुरू राहील,” असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page