आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजप शिष्टमंडळाची निवडणूक अधिकार्यांची भेट, एसआरआय अंतर्गत मतदान केंद्र व बूथ पुनर्रचनेची मागणी

*Jyotsna Wankhede*: भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनर्पडताळणी अभियानाअंतर्गत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे व बूथ पुनर्रचनेतील त्रुटी दूर करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री रविंद्र गुरनुले, उपाध्यक्ष बलराम डोडाणी, बीएलओ वन सुमित बेले, प्रलय मशाखेत्री, इश्वर वाघमारे, आदिंची उपस्थिती होती.
निवेदनात विविध भागांतील मतदारांना त्यांच्या वास्तव्यास असलेल्या परिसरापासून दूर मतदान केंद्रे देण्यात आल्यामुळे मतदानाच्या दिवशी अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे मतदारांच्या सोयीचा विचार करून मतदान केंद्रे व बूथचे पुनर्नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, हनुमान नगर, गणेश नगर, रामकृष्ण टॉकीज परिसर व बेलोरा येथील काही मतदारांना सध्या जनता शाळा, सिव्हिल लाईन येथील मतदान केंद्र देण्यात आले असून, त्याऐवजी जवळील डॉन बॉस्को शाळा, पोलीस कल्याण सभागृह किंवा संकल्प याचिका कार्यालय येथे मतदान केंद्र निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच सराई वॉर्ड व जवळपुरा परिसरातील मतदारांसाठी पोलीस कल्याण सभागृहाऐवजी जनता शाळा, सिव्हिल लाईन येथे मतदान केंद्र निश्चित करावे, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय रायपुरा नगर, धंगड नगर व तुळशी नगर येथील मतदार सध्या वेगवेगळ्या बूथमध्ये विभागले गेले असल्याने त्या परिसरासाठी स्वतंत्र मतदान केंद्र किंवा बूथ निर्माण करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
सदर प्रक्रियेदरम्यान एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या बूथमध्ये गेल्यामुळे भविष्यात ठस्व् यांच्याशी संपर्क, निवडणूक व्यवस्थापन तसेच मतदानासाठी नागरिकांना अनावश्यक गैरसोय होणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे शक्य त्या ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच बूथवर समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदारांच्या सोयीसाठी प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून आवश्यक त्या दुरुस्त्या तातडीने करण्याच्या सूचना दिल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. यावर निवडणूक प्रशासनाने सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.










