Monday, August 10, 2026
spot_img
HomePombhurnaआदिवासी दिन एका दिवसाचा उत्सव नव्हे; ३६५ दिवस समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची...

आदिवासी दिन एका दिवसाचा उत्सव नव्हे; ३६५ दिवस समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा संकल्पदिन – आ. सुधीर मुनगंटीवार

आदिवासी दिन एका दिवसाचा उत्सव नव्हे; ३६५ दिवस समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा संकल्पदिन – आ. सुधीर मुनगंटीवार

आदिवासी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक हीच आपली जबाबदारी

जागतिक आदिवासी दिनानिमित्त पोंभुर्ण्यात वनहक्क पट्ट्यांचे वितरण; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



*Jyotsna Wankhede* : जागतिक आदिवासी दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव न राहता, आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी वर्षभर चिंतन, मंथन आणि प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रेरणा देणारा दिवस ठरला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असून, समाजाच्या प्रगतीसाठी ३६५ दिवस काम करण्याचा संकल्प हीच जागतिक आदिवासी दिनाची खरी भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त पोंभुर्णा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमास भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे, तहसीलदार मोहनीश शेलवटकर, नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, भाजपा तालुका अध्यक्ष हरीश ढवस, गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे शाखाप्रमुख जगन येलके, पांडुरंग जुमनाके, विजय तोडासे, ज्योतिराव गावडे, भाजपा जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष ज्योती वेलके, राहुल संतोषवार, गुणाकार जुमनाके, गीताताई कोवे, कांताबाई मडावी, श्रीहरी सिडाम, ऋषी कोटणाके, ज्योतीताई बुरांडे, गजानन ईस्टाम, रमेश वेलादी यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बंधू-भगिनींना शुभेच्छा देताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, आजचा दिवस केवळ जागतिक आदिवासी दिन नसून क्रांती दिवसही आहे. १९४२ मध्ये गवालिया टँक मैदानावर ‘चले जाव’चा मंत्र देत स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक दिशा देण्यात आली. त्याचप्रमाणे जागतिक आदिवासी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नसून उर्वरित ३६४ दिवस आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी चिंतन-मंथन करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.

गोंडवाना आंदोलक व आदिवासी चळवळीचे शाखाप्रमुख जगन येलके महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. मात्र, माझा मुंबई येथे पूर्वनियोजित कार्यक्रम होता. समाजबांधवांच्या मागण्या आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हा त्यांच्या अंतःकरणातील आवाज जाणवला. त्यामुळे मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करून पोंभुर्ण्यात येण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जगन येलके महाराज आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आ. मुनगंटीवार यांनी कौतुक केले. विषयाच्या पाठीमागे लागून, सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची पद्धत निश्चितच कौतुकास्पद आहे,असे आ.मुनगंटीवार म्हणाले.

आदिवासी समाज हा प्रामाणिक, सात्त्विक, परिश्रमी आणि कष्टकरी असून निसर्गाशी त्याचे अतूट नाते आहे. आदिवासी समाजाने निसर्गामध्ये आनंद आणि समाधान शोधले आहे. आज निसर्गाचे रक्षण करणारा समूह कमी होत असताना नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल टिकून राहण्यामागे आदिवासी समाजाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मानवी गरजांना अंत नसतो; गरजा वाढतच जातात, मात्र संयम आणि समाधानाची भावना जपणे हीच खरी समृद्धी आहे.संयमाने निसर्गाचा आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा उपभोग घेणारा समाजच खऱ्या अर्थाने मानवतेचे रक्षण करतो, असेही आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर प्रथमच आदिवासी समाजातील भगिनी महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू विराजमान झाल्यानंतर देशातील आदिवासी समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मेहनत, जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावर आपणही देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, हा आत्मविश्वास प्रत्येक आदिवासी बांधवाच्या मनात निर्माण व्हावा, हाच त्यामागचा खरा उद्देश असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

आदिवासी समाजाच्या विकासासाठी केलेल्या विविध कामांचा उल्लेख करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना केली.‘मिशन शौर्य’च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांनी एव्हरेस्ट सर करण्याची संधी, तेंदूपत्ता बोनस, पोंभुर्णा व चंद्रपूर येथे आदिवासी वसतिगृहांची उभारणी, सावली येथील आदिवासी वसतिगृहाला मान्यता, चंद्रपूर येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने अत्याधुनिक स्टेडियम, बाबुराव शेडमाके यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट, शहरात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांसाठी शहरी शबरी आवास योजना, खावटी कर्जमाफी तसेच १२,५०० पदांची पदभरती यांसारख्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

वनहक्क पट्ट्यांचे वितरण

जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमादरम्यान पोंभुर्णा येथे वनहक्क कायद्यान्वये पात्र लाभार्थ्यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वनहक्क पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी दिवाकर आत्राम, सुरेश कोवे, प्रभाकर कोवे, एकनाथ कोवे, आनंदराव कोवे, नागेंद्र कोवे, पत्रु घोडाम, सोमनाथ पेदोर, संतोष मडावी, सदाशिव मडावी, विनायक आत्राम, साईनाथ वेलादी, श्रीकांत तलांडे, भालचंद्र कन्नाके, धर्मेंद्र मेश्राम आदी पात्र लाभार्थ्यांना वनहक्क पट्टे प्रदान करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यावेळी सोनल सोयाम, साहिल शेडमाके, आम्रपाली तोरे, आदित्य शेडमाके आणि रुपेश मडावी या गुणवंत विद्यार्थ्यांचा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page