Friday, August 14, 2026
spot_img
HomeSolapurशाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित...

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

*ज्योत्स्ना वानखेडे*: अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रार्थना संपल्यानंतर विद्यार्थी वर्गात जात असताना शाळेचे छत अचानक कोसळले. या दुर्घटनेत १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असे वंचित बहुजन आघाडीने सांगितले.

या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून शाळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी आतापर्यंत किती निधी उपलब्ध झाला आणि कोणत्या शाळांवर किती निधी खर्च करण्यात आला, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची एकूण संख्या, शिक्षक संख्या आणि विद्यार्थी पटसंख्या याबाबतचा अहवालही मागण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक इमारतींची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच शाळांना देण्यात आलेल्या विविध सुविधांचा अहवाल सादर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

निवेदन देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनेकर यांच्या कथित उद्धट बोलण्यावरून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. त्यामुळे काही काळ जिल्हा परिषद परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे, प्रशांत गोळेवार, युवक शहराध्यक्ष महेश जाधव, युवक शहर सचिव नरेंद्र शिंदे, शहर महासचिव विनोद इंगळे, सुहास सावंत, शाहिद शेख, शरीफ शेख, अक्कलकोट तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुरेश देशमुख, विजय गायकवाड, विजयानंद उघडे, श्रीनिवास संगेपान आदी पदाधिकारी उपस्थित होते. शाळांच्या सुरक्षेबाबत तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page