वनक्षेत्राच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी FIDC स्थापन करा; आ. सुधीर मुनगंटीवार यांचा वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे आग्रह
वनउत्पादनांचा शाश्वत वापर, वनाधारित उद्योगांना चालना आणि रोजगारनिर्मितीसाठी स्वतंत्र महामंडळाची गरज
FIDC स्थापनेच्या प्रस्तावाचा सर्वंकष अभ्यास करून प्रशासकीय, आर्थिक व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे वनमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
*Jyotsna Wankhede*: राज्यातील वनसंपदेचा शाश्वत व प्रभावी वापर करून वनाधारित उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासोबतच रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (FIDC) स्थापन करण्यात यावे, असा आग्रह आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री ना. गणेशजी नाईक यांच्याकडे धरला. वनक्षेत्राशी संबंधित औद्योगिक विकासासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारल्यास वनउत्पादनांचा मूल्यवर्धित वापर, उद्योगांची निर्मिती आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मोठी मदत होईल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी बैठकीत मांडली.
मंत्रालयातील दालन क्र. ५४० येथे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत FIDC स्थापन करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. श्रीमती एन सी पांडे, उपसचिव वन विभाग,एम श्रीनिवास राव प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वनबल प्रमुख,प्रवीण राजाराम मुंडे उपसचिव,आर एस रामानुजन मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर,प्रभुनाथ शुक्ला क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर ,वरिष्ठ अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आ. मुनगंटीवार यांनी राज्यातील वनक्षेत्र हे केवळ पर्यावरण संवर्धनापुरते मर्यादित न ठेवता शाश्वत औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे महत्त्वाचे साधन ठरू शकते, याकडे लक्ष वेधले. वनउत्पादनांवर आधारित उद्योग, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग तसेच वनाधारित रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी FIDC महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
FIDCच्या माध्यमातून वनउत्पादनांचा शाश्वत व प्रभावी वापर, वनाधारित उद्योगांना प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गुंतवणुकीला चालना आणि रोजगारनिर्मिती यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करता येईल. त्यामुळे राज्यातील वनक्षेत्राशी संबंधित औद्योगिक विकासाला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी FIDCची स्थापना आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाची दखल घेत वनमंत्री ना. गणेशजी नाईक यांनी FIDC स्थापनेच्या प्रस्तावाचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक प्रशासकीय, आर्थिक व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रस्तावाच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही पूर्ण करून पुढील निर्णयासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
FIDCच्या स्थापनेसंदर्भातील पुढील कार्यवाही करताना संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून प्रस्तावातील सर्व बाबींचा अभ्यास करावा, तसेच आवश्यक कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या या महत्त्वपूर्ण विषयावर वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राज्यातील वनसंपदेवर आधारित उद्योगांना नवी दिशा देण्यासाठी FIDC स्थापनेच्या प्रस्तावाला पुढील टप्प्यात गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.