*आगामी सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डी.जे. व तीव्र ध्वनिक्षेपकांवर निर्बंध ;पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे आदेश*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आगामी काळात पोळा, तान्हा पोळा, गणेशात्सव आणि विसर्जन असे विविध धार्मीक, सांस्कृतिक व सार्वजनिक उत्सव आयोजित केले जाणार आहेत. दिनांक ०५/०९/२०२६ ( रात्री २०.०० वा. ) ते २७/०९/२०२६ ( रात्री २४.०० वा ) या कालावधीत सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, कायदा व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३६ आणि कलम ३८(१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.
*प्रमुख निर्बंध व नियम :*
*लेझर लाईटवर पुर्ण बंदी ( कलम ३६ अन्वये ) -* मिरवणुकीदरम्यान Lazer Light, तीव्र तीव्रतेचे Flash Light व मानवी डोळ्यांवर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रकाश यंत्रणांच्या वापरावर पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधिकारी/ सक्षम प्राधिकारी मिरवणुकीतील लाईट उपकरणांची तपासणी करु शकतील व धोकादायक आढळल्यास ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश देतील.
*ध्वनिवर्धक व DJ वापराबाबतचे नियम ( कलम ३८(१) अन्वये ) : -*
*लेखी परवानगी अनिवार्य :* सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाउडस्पिकर, ॲम्प्लीफायर वापर करता येणार नाही.
*डी.जे. व मॉडिफाईड साउंड सिस्टीमवर बंदी :* डी जे, प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाईड साउंड इक्विपमेंट, वुफर, सबवुफर, यांसारख्या अत्यंत तीव्र व हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर पूर्णत: बंदी राहील.
*शांतता क्षेत्र :* रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांसारख्या घोषित शांतता क्षेत्र परिसरात ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत पुर्ण बंदी : रात्री १०.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व डी जे वापरण्यास सक्त मनाई राहील ( जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सूट दिलेले दिवस / वेळ वगळून )
*परिसरनिहाय ध्वनी तीव्रता मर्यादा ( डेसिबल – db ) :*
*क्षेत्र कोड क्षेत्राचा/विभागाचा प्रकार दिवसा मर्यादा, रात्री मर्यादा*
A) औद्योगिक क्षेत्र ७५ db, ७० db
B) व्यावसायीक क्षेत्र ६५ db, ५५ db
C) निवासी क्षेत्र ५५ db, ४५ db
D)शांतता क्षेत्र ( सायलन्स झोन ) ५० db, ४० db
*नियमांचे उल्लंघन केल्यास होणारी कारवाई :*
*साहित्य जप्ती व कायदेशीर कारवाई -* नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ७० अन्वये ध्वनी व प्रकाश यंत्रणा / उपकरणे जप्त केली जातील.
*अटक व खटला -* आयोजक, ऑपरेटर किंवा वाहन चालक विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ चे कलम ७२(२) अन्वये वॉरंटशिवाय अटक केली जाऊ शकते तसेच कलम १३४, १३६ अन्वये न्यायालयात खटला दाखल केला जाईल
*चंद्रपूर पोलीस प्रशासनाने सर्व नागरिक, उत्सव मंडळे व आयोजकांना शांततापूर्ण वातावरणात सण साजरे करण्याचे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.*