संस्कृतीचे जतन करतानाच समाजहिताचा संदेश देणारी नवी घडवा – किशोर जोरगेवार
संजय नगरातील तान्हा पोळा कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रतिपादन
*Jyotsna Wankhede*: तान्हा पोळा हा आपल्या समृद्ध कृषी आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अशा पारंपरिक सणांच्या माध्यमातून बालगोपाळांना आपल्या संस्कृतीची ओळख होण्यासोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक भान आणि सर्जनशीलतेची जाणीव निर्माण होते. आजच्या लाकडी बैल सजावट स्पर्धेत बालगोपाळांनी विविध सामाजिक संदेश देत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले आहेण् संस्कृतीचे जतन करतानाच समाजहिताचा संदेश देणारी ही नवी पिढी घडणे ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूर येथील संजय नगर परिसरात तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाकडी बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत परिसरातील बालगोपाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत नंदी बैलांची आकर्षक सजावट केली. पारंपरिक सजावटीसोबतच बालगोपाळांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित संदेश आपल्या सजावटीतून मांडले. त्यामुळे हा उपक्रम उपस्थित नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरला
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या महामंत्री सविता दंढारे, नगर सेविका आशा देशमूख, चंद्रशेखर देशमूख, रामचंद्र खापने, अशोक मुडपल्लीवार, हरि शेंडे, शांताराम कुरेकर, अरुन डंभारे, रमेश केदार, आसाराम रघोटे, सत्यनारायन पदमावार, संजय चिन्नेवार, दशरथ खामनकर, अनिल चामचोर, गोलु खापने आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, तान्हा पोळा हा केवळ मनोरंजनाचा किंवा स्पर्धेचा कार्यक्रम नसून आपल्या संस्कृतीशी आणि शेतकरी जीवनाशी जोडलेली परंपरा आहे. बैल हा शेतकर्याच्या जीवनातील महत्त्वाचा घटक असून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना या सणामागे आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे.
बालगोपाळांनी लाकडी बैल सजवून त्यातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, शिक्षण, सामाजिक एकोपा आणि समाजातील विविध प्रश्नांबाबत जनजागृती करणारे संदेश दिले. लहान वयातच मुलांना सामाजिक विषयांची जाणीव होणे ही सकारात्मक बाब आहे. त्यांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी असून अशा उपक्रमांना सातत्याने पाठबळ दिले पाहिजे, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
आपल्या सण उत्सवांमध्ये आधुनिकतेसोबतच सामाजिक संदेशांची जोड दिल्यास त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते बालगोपाळांच्या माध्यमातून हे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत असून भविष्यातही संस्कृती परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले जाईल असे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात लाकडी बैल सजावट स्पर्धेत सहभागी झालेल्या बालगोपाळांचे कौतुक करण्यात आलेण् यावेळी परिसरातील नागरिक, पालक, बालगोपाळ तसेच आयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तान्हा पोळ्याच्या निमित्ताने संजय नगर परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.