Tuesday, September 22, 2026
spot_img
HomeChandrapurविद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशासाठी सातत्याने प्रयत्न करावे - किशोर जोरगेवार

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशासाठी सातत्याने प्रयत्न करावे – किशोर जोरगेवार

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशासाठी सातत्याने प्रयत्न करावे – किशोर जोरगेवार

जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शन कार्यशाळेत आमदार किशोर जोरगेवार यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

*Jyotsna Wankhede*: 

इयत्ता ११ वी आणि १२ वी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून या काळात योग्य मार्गदर्शन घेत आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधींची योग्य माहिती घेऊन सातत्याने प्रयत्न केल्यास प्रत्येक विद्यार्थी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम तयार करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

  जिल्हा परिषदेच्या वतीने प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा तसेच भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

             या कार्यक्रमाला शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी वसुमना पंत, कानपूर चे अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुमित रामटेके, जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले, एमपिएससी चे उपविभागीय अधिकारी बालाजी कदम, सैनिक शाळेचे मुख्याध्यापक अनुप देव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता जय तिवारी, कृषी विस्तार अधिकारी आदित्य महल्ले, डॉ. भाग्यश्री बेलसरे, शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश पाताळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

  यावेळी पूढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कोणत्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे, आपली क्षमता कोणत्या क्षेत्रात आहे आणि भविष्यात कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याचा विचार करून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी. केवळ इतर विद्यार्थी काय करत आहेत, याचे अनुकरण न करता स्वतःची आवड आणि क्षमता ओळखून निर्णय घ्यावा.

             आज शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम तयार करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रभावी आणि सुलभ पद्धतीने शिक्षण घेता येईल, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

            विद्यार्थ्यांनी यशासाठी सातत्य, शिस्त आणि मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. परीक्षेतील गुण महत्त्वाचे असले तरी त्यासोबत ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही महत्त्व दिले पाहिजे. अपयश आले तरी निराश न होता त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी जोपासावी. आज उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक आणि करिअरच्या संधींचा विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग करून आपले भविष्य घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

   विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती मिळते, त्यांच्या मनातील संभ्रम दूर होतो आणि भविष्यातील वाटचालीसाठी आत्मविश्वास निर्माण होतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा आणि `संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिली.

            कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे अधिकारी, शिक्षक, मार्गदर्शक तसेच इयत्ता ११ वी आणि १२ वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांबाबत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page