*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात सौ.कलाताई पिंपळशेंडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे दिनांक:३०/०९/२०२६ रोजी विद्यालयातील सेविका सौ. कलाताई ईश्वर पिंपळशेंडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या असमा खान खलिदी मॅडम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मा. इब्राहिम जव्हेरी सर, उपसचिव, बल्लारपूर सेवा समिती, बल्लारपूर उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षिका सुनीता कांबळे मॅडम, मुख्याध्यापिका हर्षा वरगंटीवार मॅडम, सत्कारमूर्ती सौ. कलाताई ईश्वर पिंपळशेंडे, त्यांचे पती मा. ईश्वर पिंपळशेंडे तसेच त्यांचे आप्तस्वकीय मंचावर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी मा. इब्राहिम जव्हेरी सर यांच्या हस्ते सौ. कलाताई पिंपळशेंडे यांचा भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कलाताईंना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव केला. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, भावी पिढी घडविण्यामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महिलांना शिक्षित व सक्षम करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका हर्षा वरगंटीवार मॅडम, पर्यवेक्षिका सुनीता कांबळे मॅडम, प्रशांत बनकर सर व संजय ठोंबरे सर, सुनील भाऊ यांनी कलाताई पिंपळशेंडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. कर्तव्यनिष्ठेचे आणि विद्यालयातील योगदानाचे कौतुक करून त्यांना पुढील जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या असमा खान मॅडम यांनी कलाताई पिंपळशेंडे यांच्या सेवाकाळातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यालयाच्या प्रगतीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करून सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदी, निरोगी व सुखसमृद्धीचे जावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पवार सर यांनी केले. या सत्कार समारंभास इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलाताई पिंपळशेंडे यांच्या सेवेला कृतज्ञतापूर्वक सलाम करत हा सत्कार समारंभ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.