Monday, May 18, 2026
HomeNagpurपाण्यासाठी तिसरे महायुद्ध टाळायचे असेल तर देशभरात ‘जलयोद्धे’ तयार होणे आवश्यक –...
spot_img

पाण्यासाठी तिसरे महायुद्ध टाळायचे असेल तर देशभरात ‘जलयोद्धे’ तयार होणे आवश्यक – आ. सुधीर मुनगंटीवार

पाण्यासाठी तिसरे महायुद्ध टाळायचे असेल तर देशभरात ‘जलयोद्धे’ तयार होणे आवश्यक – आ. सुधीर मुनगंटीवार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्यशैलीचे आमदार मुनगंटीवार यांनी केले कौतुक

‘पाणी बचाव, पाणीदार राष्ट्र’ संकल्पनेवर देशव्यापी महामंथनाची गरज

Jyotsna Wankhede : भविष्यात पाण्यासाठी संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी आजपासूनच व्यापक पातळीवर जलसंवर्धनाची चळवळ उभारण्याची गरज असून देशभरात ‘जलयोद्धे’ तयार होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने ‘जलयोद्धा’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या पूर्ती सिंचन कल्याणकारी संस्थेच्या जलसंधारण क्षेत्रातील यशस्वी २५ वर्षांच्या निमित्ताने नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘नागपूर जलसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पाणी क्षेत्रात कार्यरत देशातील अनेक जलयोद्धे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

आ. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक करत त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा गौरव केला. मा. गडकरी यांचा ‘डीएनए’ सामान्य नेत्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा असून ‘असंभव’ हा शब्द त्यांच्या शब्दकोषातच नसल्याचे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले. ते ज्या विषयाला हात लावतात, त्या विषयाला नवी ऊर्जा आणि दिशा मिळते. त्यामुळे अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात साकार झाल्या आहेत, असा विश्वासही आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा देताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, अनेकदा मला नितीन गडकरी यांच्या गाडीत प्रवास करण्याची संधी मिळाली. सामान्यतः राजकारण्यांच्या गाडीत राजकीय चर्चा रंगत असतात; मात्र मा.गडकरी हे त्याला अपवाद आहेत. त्यांच्या गाडीत राजकारणापेक्षा पर्यावरण संवर्धन, शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल आणि जलसंवर्धन अधिक प्रभावी कसे करता येईल, याच विषयांवर चर्चा होत असते. हीच त्यांची रचनात्मक विचारसरणी आणि विकासात्मक दृष्टिकोन ही त्यांची खरी ताकद आहे.

जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना आ. मुनगंटीवार यांनी मानवी स्वार्थी प्रवृत्तीवर भाष्य केले. आपण ज्या नद्यांचे पाणी पितो, त्याच नद्यांचे शोषण करण्याचे काम आपण करत आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पाण्याचे योग्य चिंतन आणि नियोजन होत नसेल, तर इतर कोणत्याही विकासाचा उपयोग नसल्याचे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील जलक्रांतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, राज्यात पाण्याचे महत्त्व अधिक प्रभावीपणे अधोरेखित करण्यासाठी ‘सिंचन विभागा’चे नाव बदलून ‘जलसंपदा विभाग’ करण्यात आले. तसेच राज्यातील ७५ नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम वर्धा येथून २०२२ मध्ये मला राबवता आला आणि त्याअंतर्गत ११० नद्यांचे सखोल अध्ययन करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनासाठी वनमंत्री असताना ‘ग्रीन आर्मी’ स्थापन केल्याचे सांगत त्यांनी या माध्यमातून राज्यात २५५० किलोमीटरचे हरित आच्छादन वाढवण्यात आले असे आ. मुनगंटीवार म्हणाले.भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी आता ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ संपूर्ण देशाला जोडणाऱ्या ‘पाणी बचाव, पाणीदार राष्ट्र’ या संकल्पनेवर व्यापक महामंथन होणे गरजेचे असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने ‘जलयोद्धा’ म्हणून पुढे येण्याचे आवाहन करत आगामी काळात स्वतःही पाण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा संकल्प आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page