भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे “लोकशाही सेनानी गौरव सन्मान सोहळा” उत्साहात संपन्न

*Jyotsna Wankhede*:भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील आणीबाणीचा काळ हा स्वातंत्र्य, संविधान आणि लोकशाही मूल्यांवरील मोठा आघात म्हणून ओळखला जातो. या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या लोकशाही सेनानी (मिसाबंदी) व त्यांच्या परिवारियांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने “लोकशाही सेनानी गौरव सन्मान सोहळा” उत्साहात संपन्न झाला.
गांधी चौक येथील भाजपा महानगर कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ लोकशाही सेनानींचा शाल, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कृष्णाजी देशपांडे, गिरीशजी अणे, सुधीरजी टिकेकर व हेमंतजी डाहाके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आणीबाणीच्या काळातील संघर्षमय आठवणींना उजाळा देत लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाही सेनानींनी दिलेल्या त्याग, समर्पण आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच लोकशाही मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून रत्नाकरजी जैन व प्रकाश आवळे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सन १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळातील घटनांची, संघर्षाची व लोकशाही रक्षणासाठी झालेल्या आंदोलनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष छायाचित्र व माहिती प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच आणीबाणीच्या काळातील वास्तव, लोकशाही सेनानींचे योगदान आणि त्याग यावर आधारित विशेष चित्रफितीचेही प्रकाशन व प्रदर्शन करण्यात आले. या माध्यमातून उपस्थितांना त्या काळातील परिस्थितीची जाणीव करून देत लोकशाही मूल्यांच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाला भाजपा चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारिणी परिषद सदस्य तुषार सोम, ज्येष्ठ नेते रत्नाकरजी जैन, प्रकाश आवळे, महानगर महामंत्री रविंद्र गुरनुले, सविता दंढारे, विधानसभा प्रमुख वंदना हातगावकर, युवा नेते रघुवीर अहिर तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र गुरनुले यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रवीण गिलबिले यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप सतीश तायडे यांनी आभार प्रदर्शनाने केला.
लोकशाही सेनानींच्या संघर्षमय कार्याला अभिवादन करत त्यांच्या प्रेरणादायी योगदानाचा गौरव करणारा हा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.









