चंद्रपूर जिल्ह्यातील गणित शिक्षकांची कार्यशाळा संपन्न
श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील गणित शिक्षकांची कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ चंद्रपूर येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार मा. श्री. सुधाकर अडबाले सदस्य, विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते झाले. कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. राजकुमार हिवारे, तर प्रमुख अतिथी श्री. सुनील श्रीवास्तव, अध्यक्ष महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ, श्री. ओमप्रकाश गुप्ता, अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ गोंदिया, तथा कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून श्री. नरेंद्र पिपरे विद्या समिती प्रमुख, महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ, श्री. सुनील नागमोते, माजी सदस्य महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ श्री. सुनील शेरकी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ श्री. सी. जे. चौधरी अध्यक्ष गणित अध्यापक मंडळ गोंदिया उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनातून मा. श्री सुधाकर अडबाले यांनी गणित जमणे व गणित न जमणे या दोन गोष्टीच जीवनाची दिशा ठरवितात. अभ्यासक्रमातील गणित जमले तर जीवनाचे गणित सुद्धा जमते तेव्हा गणिताचे महत्त्व लक्षात घेऊन अध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या गणितातील संकल्पना, संबोध स्पष्ट होण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करावे तसेच आपल्या जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचवावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. सुनील श्रीवास्तव यांनी विद्यार्थी घडविण्यात गणित अध्यापक मंडळाची भूमिका विशद करून विद्यार्थ्यांना मध्ये गणिताची गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राजकुमार हिवारे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून परिवर्तन हा जगाचा नियम असून अभ्यासक्रमातील परिवर्तन व त्या अनुषंगाने अध्ययन अध्यापनात करायचे बदल याविषयी प्रत्येक शिक्षकांनी अपडेट असणे आवश्यक असून नित्य होणाऱ्या बदलासोबत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. गणित कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी विषयातील नाविन्यपूर्ण प्रयोग करून अध्यापन कौशल्य वृद्धिंगत करावे असे आवाहन केले.
कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री. सुनील नागमोते यांनी शालेय स्पर्धा परीक्षा व गणित याविषयी आपल्या सत्रातून उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शक श्री. नरेंद्र पिपरे यांनी महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित केले जाणारे उपक्रम याविषयी माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाद्वारे आयोजित गणित संबोध परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षा, गणित प्रज्ञा परीक्षा व गणित पारंगत परीक्षा या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवून त्यांची गणित विषयातील गुणवत्ता वाढण्यासाठी करावयाचे प्रयत्न याविषयी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शक श्री. सुनील शेरकी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात गणितीय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे याकरिता चंद्रपूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ तसेच तालुका गणित अध्यापक मंडळ गठीत करण्याची कार्यवाही केली.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विषय सहाय्यक सपना पिंपळकर यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय जिराफे यांनी केले.