आज सकाळी मोबाईल हाती घेतला आणि माझ्या एका भगिनीने व्हाॅटस् अॅपवर पाठविलेला हा फोटो व त्यावरील मजकूर नजरेसमोर आला. आपल्यापैकी प्रत्येक जण आनंदाच्या शोधात असतो. आपण कामधंदा करतो, तोही पैसा मिळविण्यासाठी, पैसा मिळाला की आपल्याला हव्या त्या सुखसोयीच्या वस्तू व सेवा खरेदी करता येईल हा त्यामागचा उद्देश असतो. पैसा हेच सर्व सुखाचे उगमस्थान आहे असाच विचार सर्वसामान्य व्यक्ती करीत असते.
तथापि, पैशामुळेच सर्व प्रकारची सुखे प्राप्त झाली असती तर…..
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या
असा विचार आपल्या संतमहात्म्यांनी दिला नसता.
आनंद ही एक मानसिक अवस्था आहे, जवळ खुप पैसा असला तरच ती प्राप्त करता येते असे नाही, पैसा नसतानाही आनंदी आयुष्य जगणारी असंख्य व्यक्ती आपल्याला दिसतात.
मला याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील यांची एक आठवण प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. गोरगरीब कुटुंबातील मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांनी शाळा व वसतीगृहे सुरू केली हे सर्वांना माहिती आहे. या वसतीगृहात राहणार्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस ते लक्षात ठेवत. पहिल्या दिवशी रात्री आचारीला दोनचार भाकरी जास्त टाकण्याची सूचना गुपचूप देत. दुसर्या दिवशी त्या उरलेल्या भाकरी कुस्करून त्यात गुळ व तेल घालून त्याचे लाडू बनवीत असत. ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे, त्याला प्रार्थनेच्या वेळी समोर बोलावून, आज आपल्या +++++ याचा वाढदिवस आहे, आपण सगळ्यांनी मिळून त्याला शुभेच्छा देवून व गोडधोड खाऊन साजरा करू, असे सांगून शुभेच्छा देत व बनविलेले शिळ्या भाकरीचे लाडू सर्व विद्यार्थ्यांना वाटून देत. विद्यार्थीही अत्यंत आनंदाने तोंड गोड करीत ज्याचा वाढदिवस आहे त्याला शुभेच्छा देत असत. ज्याचा वाढदिवस आहे तो तर आनंदी होत असेच पण वसतीगृहात राहणारे आपल्या आईवडील यांचेपासून दूर राहणारे सर्व विद्यार्थीही आनंदी होत असत.
या प्रकारात कोणताही अतिरिक्त खर्च नव्हता, होती तर आनंद देण्याची मानसिकता, ही मानसिकता कोणत्याही बाजारात विकत घेता येत नाही, तीचा उगम आपल्या अंतःकरणातील तळात दडलेला असतो. ज्याला हा तळ गाठता येतो, तो कशाही परिस्थितीत आनंद घेवू शकतो, आनंदी राहू शकतो.
हीच जीवनाची गुरूकिल्ली आहे. सोबतचा फोटो पाहा, चेहर्यावरील हास्य व डोळ्यातील आनंद याची तुलना कशाशीच करता येणार नाही याची अनुभूती आपणासही येईल.
राम पवार
अमरावती
भ्रमणध्वनी :9284196496
(24 जानेवारी, 2019 रोजी प्रथमतः फेसबुकवर टाकलेली पोस्ट.)