शिक्षक-कर्मचारी यांचे वेतन उशिराने करून ईकुबेर पदधती संपविण्याचा शिक्षण विभागाचा कट ? -खाजगी शाळा शिक्षक संघ
श्रेयश वानखेडे:
शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग, दिनांक ४ जानेवारी २०२४ व शासन निर्णय वित्त विभाग, दिनांक २८ जुन २०१३, दिनांक ११ मार्च २०२० अन्वये शिक्षण विभागातील शिक्षक – कर्मचारी यांचे नियमित वेतन विलंबाने होऊ नये यासाठी ई-कुबेर पद्धत वापरली जात आहे. वेतन थेट शिक्षक-कर्मचारी यांचे खात्यात जमा करण्यात येत आहे
खाजगी शाळा शिक्षक संघाने याबाबत क्रमांक ३३(अ)/सहा संचालक -वरिष्ठ कोषागार अधिकारी/२०२४ दिनांक २७ मे २०२४ अन्वये नागपूर विभागातील सर्व मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढण्यासाठी विशेषतः चंद्रपूर यांना विनंती करण्यात आलेली आहे. शिक्षण विभागातील वेतन अनुदान तरतूद करण्यात आली असतांनाही केवळ मा. अधिक्षक, वेतन पथक माध्यमिक, चंद्रपुर यांचे दुर्लक्षामुळे अनुदानित खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षक-कर्मचारी यांचे माहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०२४ चे नियमित वेतन विलंबाने झालेले आहे.
खाजगी शाळा शिक्षक संघाने मान. राजेश पातळे शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे सोबत मंगळवारी दिनांक २८ जानेवारी ला चर्चा केली असता जानेवारी चे नियमित वेतन विलंबाने होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले. परंतु वेतन पथकाने वेतन अनुदान दिनांक २८ जानेवारी ला येऊनही चंद्रपूर जिल्ह्यातील देयके तयार नसल्याने दिनांक २९ जानेवारी ला पाठविण्यात आले असे मान. प्रफुल्ल वडेट्टीवार अधिक्षक वेतन पथक माध्यमिक चंद्रपूर यांनी सांगितले, वडेट्टीवार यांनी ट्रेझरीला वेतन देयके पाच दिवस ठेवण्याचा अधिकार आहे असा नविन शोध लावला असुन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
वेतन पथक यांचे दुर्लक्ष, स्वतःचे वेतन मात्र त्याच महिन्यात 31 तारखेला घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचारी यांचे वेतन उशिराने करून, ईकुबेर पदधती पद्धत संपविण्याचा चंग बांधलेला आहे असे दिसून येते. वर्धा व भंडारा जिल्ह्यातील वेतन दिनांक एक फेब्रुवारीला शनिवार सुट्टी आल्यामुळे जानेवारी महिन्याच्या 31 तारखेला झाले परंतु नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक-कर्मचारी यांचे वेतन तीन फेब्रुवारी पर्यंत झाले नाही. याबद्दल खाजगी शाळा शिक्षक संघाचे पुरषोत्तम टोंगे, रविंद्र जेनेकर, विजय नंदनवार, प्रमोद रेवतकर यांनी एका निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.