सेलूत कृषि अधिकार्याची नेमणूक करा.
सेलू तालुका दबाव गटाची कृषीमंत्र्यांकडे निवेनाद्वारे मागणी.
श्रेयश वानखेडे : दि.27 रोजी सेलू येथे रिक्त असलेल्या पदावर तात्काळ कृषि अधिकार्याची नेमणूक करण्यात यावी व शेतकर्यांची होणारी फसवणूक थांबवावी, अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक अॅड. श्रीकांत वाईकर यांनी कृषिमंत्र्यांना पाठविलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.सेलू येथील कृषी अधिकारी तसेच संबंधित खात्यातील काही पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. येथील कृषि अधिकार्याचा अतिरिक्त पदभार हा परभणीतील अधिकार्याकडे आहे. सध्या खरीपाचा हंगाम सुरु आहे. विशेषतः मराठवाड्यात अप्रमाणित खते, बियाणे व औषधांची राजरोजपणे सर्रास विक्री होत आहे. कपाशीच्या बियाणांचा कृत्रिम तुटवडा करुन चढ्या भावाने विक्री सुरु आहे. शासकीय नियंत्रण नसल्यामुळे व्यापार्यांद्वारे शेतकरी वर्गाची लूट चालू आहे. त्यामुळे सेलू येथे तात्काळ कृषि अधिकार्याची नेमणूक करावी व शेतकर्यांची होणारी लूट व फसवणूक थांबवावी, अशी मागणी अॅड. वाईकर यांनी केली आहे.