बामणी ब्रीज: प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ‘AAP’चा एल्गार
लोकांची समस्या सुटली नाही तर १३ जुलै नंतर काम बंद पाडणार!
श्रेयश वानखेडे: दिनांक:- ०९ जुलै २०२५ बामणी येथील ब्रीज बांधकामामुळे शिवनगर वॉर्डात निर्माण झालेल्या गंभीर समस्यांबाबत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आम आदमी पार्टी आता आक्रमक झाली आहे. ‘AAP’ चे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांच्यासोबत तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी नुकतीच रस्त्याची पाहणी केली असून, परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली आहे. ‘AAP’ने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दास दिवसाचा अल्टिमेटम मधून अर्धि कालावधी संपली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पावसाळ्यात चिखल, रात्रीच्या वेळी अपुरे दिवे, खराब झालेले रस्ते आणि वाढत्या अपघातांमुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुमारे २५०-३०० लोकांच्या वस्तीसाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. ३ जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत आणि कंत्राटदार यांच्या उपस्थितीत ‘AAP’ने सुरक्षित पर्यायी मार्ग, खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, पुरेसे दिवे आणि तो पर्यंत अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, उपविभागीय अधिकाऱ्यांनी चार दिवसांत समस्या सोडवण्याचे निर्देश दिले होते, मात्र या निर्देशांचे पालन अद्याप झालेले नाही.
दहा दिवसांच्या अल्टीमेटमचा अर्धा कालावधी उलटला तरी कामाला सुरुवात नाही!
शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी १३ जुलै २०२५ पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि ब्रीजचे काम पूर्णपणे बंद पाडण्याचा इशारा दिला होता. या अल्टीमेटमचा अर्धा कालावधी (पाच दिवस) उलटूनही कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. “आम्ही घेणारी तीव्र भूमिका यास ठेकेदार, ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असतील. जनहितार्थ केलेल्या मागणीला आणि आमच्या इशाऱ्याला हलक्यात घेऊ नका,” असेही पुप्पलवार यांनी ठणकावून सांगितले आहे. १३ जुलै नंतर आंदोलन १००% होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.