आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारपूर येथे राज्य राखीव पोलीस बलासाठी ४५ एकर जागा उपलब्धतेचा मार्ग मोकळा
आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक संपन्न
विसापूर येथील बंद पॉवर हाऊसची जागा हस्तांतरणासाठी तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
Jyotsna Wankhede: राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारपूर येथे राज्य राखीव पोलीस बलासाठी (एसआरपीएफ) स्वतंत्र व सुसज्ज केंद्र उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहे. मौजा विसापूर येथील बंद असलेल्या पॉवर हाऊसची सुमारे ४५ एकर जागा राज्य राखीव पोलीस बलासाठी उपलब्ध करून देण्याच्या विषयाला आ.मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे निर्णायक गती मिळाली असून या संदर्भात राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत जागेची सद्यस्थिती, मालकी हक्क, हस्तांतरण प्रक्रियेतील अडचणी तसेच एसआरपीएफसाठी त्या जागेची आवश्यकता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांना तातडीचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत राज्य राखीव पोलीस बलासाठी सदर जागेची आवश्यकता व उपयोगिता यावरही सखोल चर्चा झाली. यावेळी या बैठकीस राजकुमार व्हटकर अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल, मुंबई,दूरदृष्टी प्रणालीद्वारे वसुमणा पंत जिल्हाधिकारी चंद्रपूर,
मोहम्मद सुयज हक (IG,PEC DG, ऑफिस मुंबई ) ,उद्धव दहिफळे सहसचिव, एमएससीबीचे संदीप हाके तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी स्थानिक पातळीवरील बाबी, उपलब्ध पर्याय तसेच आवश्यक प्रशासकीय समन्वयाबाबत माहिती सादर केली. ऊर्जा विभागाने जागेच्या मालकी व तांत्रिक बाबींविषयी स्पष्टीकरण दिले. सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत सर्वानुमते सहमती दर्शविण्यात आली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत बल्लारपूर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एसआरपीएफसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची गरज ठामपणे मांडली. त्यांच्या आग्रहानंतर बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना संबंधित ४५ एकर जागेचा मालकी हक्क, सद्यस्थिती व अडचणी यांचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. ऊर्जा विभागाने जागेच्या हस्तांतरणासंदर्भातील तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा स्वतंत्र अहवाल सादर करावा, असेही ठरविण्यात आले. तसेच राज्य राखीव पोलीस बल विभागाने जागेच्या आवश्यकतेबाबत तपशीलवार प्रस्ताव शासनास सादर करावा, तर गृह विभागाने सर्व अहवालांचा एकत्रित आढावा घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक असल्यास संयुक्त पाहणी आयोजित करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने राज्य राखीव पोलीस बलासाठी स्वतंत्र, सुसज्ज आणि कायमस्वरूपी जागा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे ठामपणे नमूद केले. विसापूर येथील बंद पॉवर हाऊसची जागा एसआरपीएफसाठी उपलब्ध झाल्यास परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता वाढेल, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे केवळ सुरक्षा व्यवस्थेलाच बळकटी मिळणार नाही, तर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी आणि पूरक सुविधा निर्माण होण्यासही मोठी मदत होईल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने आणि तातडीने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या. बल्लारपूर परिसराच्या सुरक्षा, प्रशासनिक सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य राखीव पोलीस बलासाठी स्वतंत्र व सुसज्ज जागा उपलब्ध झाल्यास संपूर्ण परिसराच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला मोठी बळकटी मिळेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे विषय प्राधान्याने मार्गी लावून लवकरात लवकर अंतिम निर्णय घ्यावा, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. या निर्णयामुळे बल्लारपूरसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या राखीव पोलीस बलासाठी ४५ एकर जागा उपलब्धतेचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे.