आ. सुधीर मुनगंटीवार यांची शेतकऱ्यांना धान बोनस देण्यासाठी शासनाकडे ठोस मागणी
आ.मुनगंटीवार यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यानी दिले आश्वासन
मागील वर्षी बोनस मंजूर; यावर्षीही हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी आग्रही पाठपुरावा
Jyotsna Wankhede: धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनात प्रती हेक्टर २० हजार रुपयांचा धान बोनस देण्याची ठोस मागणी शासनाकडे केली. विदर्भात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर धान लागवड होत असून उत्पादन खर्च, मजुरी तसेच खत-बियाण्यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लवकरच धानाचा बोनस देण्याचे आश्वासन दिले.
मागील खरीप हंगामात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २० हजार रुपयांचा बोनस मंजूर करण्यात आला होता. २५ मार्च रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करून या बोनसचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला होता. विशेष म्हणजे, काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धान विक्री केली नसली तरी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली होती. या निर्णयामुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते.
याच पार्श्वभूमीवर, यावर्षीही धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सभागृहात धान बोनसची आग्रही मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ही मागणी प्रभावीपणे मांडत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, प्रती हेक्टरी २० हजार धान बोनस देण्यासाठी सभागृहात आश्वस्त केले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाच्या बोनसपोटी १६२८ कोटी रुपयांची विक्रमी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली होती. या निर्णयामुळे विदर्भातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला.
पालकमंत्री असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्रमी २०२ कोटी रुपयांचा पीक विमा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, मागील वर्षी हेक्टरी २० हजार रुपयांच्या धान बोनससाठी २२७ कोटी रुपयांची तरतूद करून ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. धान चुकत्याचे २७.५२ कोटी रुपये मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कामही त्यांच्या पुढाकारातून झाले आहे.
नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा धान बोनसची मागणी करून शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर सातत्याने लढण्याची आ.सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका आणि कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, हे विशेष.








