नगराध्यक्षपदी मिलिंद सावंत विजयी, प्रभाग 8 मधील विनोद बोराडे यांचा पराभव.
गड आला पण सिंह गेला.
Jyotsna Wankhede: येथील नगर परिषदेसाठी झालेल्या अटीतटीच्या सार्वत्रिक निवडणूकीत नगराध्यक्षपदी भाजपाचे मिलिंद सावंत विजयी झाले आहेत. तर भाजपाचे पॅनल प्रमुख विनोद बोराडे यांचा प्रभाग 8 मध्ये पराभव झाल्यामुळे भाजपचा गड आला पण सिंह गेला अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. नगरसेवक पदासाठी भाजपाचा एक हाती झेंडा फडकला असून २६ पैकी १४ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.सेलू नगर परिषदेच्या एकूण १३ प्रभागा तील २६ नगरसेवक पदाच्या निवडणुकीत तब्बल १४ जागेवर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे ७ व शिवसेना शिंदे गटाचे ४ तर १ अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसचे पॅनल प्रमुख हेमंतराव आडळकर यांच्या पत्नी महानंदा आडळकर, माजी नगराध्यक्ष पवनराजे आडळकर यांनी एक हाती विजय मिळवला आहे.भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलिंद सावंत यांना १३ हजार ९६० तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अध्यक्ष पदाचे उमेदवार आत्माराम साळवे यांना १३ हजार ६४६ एवढी मते मिळाली. अतिशय अटीतटीच्या लढतीत मिलिंद सावंत हे ३१७ मतांनी विजयी झाले आहेत.सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या एकूण ५ फे-या झाल्या. दुपारी १च्या सुमारास ५ही फे-यातील व १३ प्रभागातील २६ उमेदवारांची मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर करण्यात आला. त्यात भाजपाने १४ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. भाजपा पॅनल प्रमुख व गेल्या २५ वर्षापासून नगरपरिषदेत आपले अधिराज्य गाजवणारे विनोद बोराडे हे मात्र पराभूत झाले. त्यांना काँग्रेसचे मिलिंद पवार यांनी ८८२ मते घेत विनोद बोराडे यांचा 88 मतांनी पराभव केला. नगर परिषदेवर भाजपाची सत्ता आली असली तरीही गड आला पण सिंह गेला असेच म्हणावे लागेल.शहरातील महत्वाचा समजल्या जाणारा प्रभाग १ ब विनोद बोराडे यांचे पुतणे साईराज मुकेशराव बोराडे हे विजयी झाले असून त्यांना ८३५ मते मिळाली आहेत. शिवसेना शिंदे गटाला ४ जागी विजय मिळाला असून संदीप लहाने, डॉ. अनिकेत जोगदंड, श्रीमती देवधर यांचा विजय झाला. भाजपाने तिकीट न दिल्यामुळे अपक्ष म्हणून उभे राहिलेले कपिल फुलारी हे देखील विजयी झालेले आहेत.