Friday, April 24, 2026
HomeChandrapurआदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास हाच राजमाता राणी हिराई जन्मोत्सवाचा संकल्प
spot_img

आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास हाच राजमाता राणी हिराई जन्मोत्सवाचा संकल्प

आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास हाच राजमाता राणी हिराई जन्मोत्सवाचा संकल्प

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार

आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूरमध्ये राजमाता राणी हिराई जन्मोत्सव सोहळा

राज्य शासनाच्या वतीने साजरा झाला राजमाता राणी हिराई जन्मोत्सव


Jyotsna Wankhede: आदिवासी समाजातील तरुण-तरुणी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. पण यासाठी आणखी मोठ्या प्रामाणात सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून समाजाचा सर्वांगीण विकास साधणे हाच राजमाता राणी हिराई जन्मोत्सव सोहळ्याचा मुख्य संकल्प आपण करुया, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर येथील कोहीनूर मैदान, दादमहल वार्ड येथे राजमाता राणी हिराई जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आमदार श्री. मुनगंटीवार बोलत होते.

या कार्यक्रमाला श्री अशोक उईके पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा व आदिवासी मंत्री, सौ संगीताताई खांडेकर महापौर चंद्रपूर मनपा , उप महापौर श्री प्रशांत दानव ,श्रीमती वसुमना पंत  जिल्हाधिकारी चंद्रपूर,श्री पुलकित सिंह  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री अकुनुरी नरेश आयुक्त चंद्रपूर मनपा, राहुल पावडे माजी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष, सौ जयश्री जुमडे गटनेता,सौ मनस्वी गिरे सभापती स्थायी समिती ,श्री नंदू नागरकर नगरसेवक ,श्री प्रज्वलंत कडू नगरसेवक,श्री रवी लोणकर नगरसेवक ,श्री शुभम गेडाम आदिवासी नेता,श्री शेषराव टाले उपायुक्त मनपा ,श्री संदीप चिद्रेवार उपायुक्त मनपा, श्री विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर, श्रीमती नम्रता ठेमस्कर ,श्री सुरज पेदुलवार ,श्री विशाल निंबाळकर, श्री धनराज कोवे, श्री शांताराम वुईके अध्यक्ष राणी हीराई सेवा समिती यांची उपस्थिती होती.

या महोत्सवासाठी आपण राज्य शासनाकडून २५ लाख रुपये आणले. पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त निधी आणुया. हाच महोत्सव मुंबईच्या गेट-वे-ऑफ इंडियावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी इतिसाहाचा दाखला देताना सांगितले, ‘आज आपण ‘नारी से नारायण’ असा संकल्प करीत आहोत. पण सन १७०४ चा प्रसंग आठवा. राजा वीर शहा यांचे निधन झाले तेव्हा पूत्र रामशहा अल्पवयीन होते. त्यामुळे राजमाता राणी हिराईने राज्याची सूत्रे हाती घेतली. १७०४ ते १७१९ अश्या १५ वर्षांच्या कार्यकाळात केवळ जिल्ह्यात नव्हे तर गोंडवनात, चांदागडमध्ये जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य केले. या इतिहासाची आठवण पुढच्या अनेक पिढ्यांना असण्याची गरज आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचे शिष्टमंडळ मला भेटायला आले आणि राणी हिराई महोत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. मी क्षणाचाही विलंब न करता राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार यांना फोन केला. राणी हिराई जन्मोत्सव सोहळा सरकारच्या वतीने साजरा करण्याचे आवाहन केले आणि आज हा सोहळा आपण साजरा करतोय.’

चंद्रपूरमधील एकाहून एक ऐतिहासिक वास्तू असोत किंवा माता महाकालीचे पवित्र मंदिर असो या सर्वांच्या निर्मितीत राजमाता राणी हिराई यांचे मोठे योगदान आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. इतिहास विसरणाऱ्या समाजाचे भविष्य कधीच उज्ज्वल होत नाही, असे म्हटले जाते.म्हणूनच हा सोहळा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, तो आपल्या संकल्पाचा उत्सव आहे. या संकल्पाला बळ मिळावे, यासाठी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला माता महाकाली मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतल्याचा उल्लेखही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला.

आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘आदिवासी समाज एक प्रामाणिक आणि शुरवीर समाज आहे. पर्यावरणावर प्रेम करणारा समाज आहे. मेहनत करण्यात तर हा समाज कुठेही कमी नाही. देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देखील एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूरमधील पाच आदिवासी तरुणांचा मन की बात मध्ये आवर्जून उल्लेख केला होता. फक्त काही दिवसांच्या प्रशिक्षणात तयार झालेले १७-१८ वर्षांचे आदिवासी तरुण मिशन शौर्यमध्ये एव्हरेस्टवर गेले आणि त्याठिकाणी माता महाकालीचा फोटो ठेवून झेंडा फडकवला.’

आदिवासी समाजाच्या शक्तीला नवा हुंकार देण्याची गरज
आदिवासी समाजाने आपल्यामध्ये असलेली शक्ती जागवण्याची गरज आहे. या शक्तीला नवा हुंकार देण्याची गरज आहे. आदिवासी समाजातील तरुण-तरुणी पुढाकार घेतील तरच ते शक्य आहे. एकलव्य कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय अर्जुनापेक्षा एक पाऊल पुढे होता, हे विसरू नका. पण, आदिवासी समाजात असलेले गुण विकसित करण्याचे काम सर्वांना एकत्र येऊनच करावे लागेल. आदिवासी समाजाने एकत्र यावे आणि एकमेकांना सहकार्य करावे, असे आवाहनही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले.

औद्योगिक क्षेत्रात वाढावा आदिवासी तरुणांचा सहभाग
मी अर्थमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात ३ हजार गावांना पाच टक्के निधी देण्याचा निर्णय घेतला. नामवंत शाळेचा निर्णय केला. आता शबरी आवास योजना चंद्रपूर शहरासाठी लागू करण्यात आली आहे. आज औद्योगिक क्षेत्रात आदिवासी तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे. एमआयडीसीमध्ये आदिवासी तरुणांसाठी शंभर टक्के आरक्षण ठेवले तर खऱ्या अर्थाने या तरुणांना आणि पर्यायाने आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार आहे. त्याचवेळी राजमाता राणी हिराईने या क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाचेही फलित होईल, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

आदिवासी तरुण पटकावतील ऑलिम्पिक मेडल
चंद्रपूरमध्ये वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने १३७ कोटींचे स्टेडियम उभे होत आहे. यातून मोठे ध्येय गाठायचे आहे. ऑलिम्पिकमध्ये आपल्याला खूप कमी पदकं प्राप्त होतात. पण आम्ही स्वप्न बघितलं आहे. २०३६ मध्ये आदिवासी तरुण-तरुणी ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावतील, त्यासाठीच हे आंतरराष्ट्रीय स्टेडियम आपण उभारतोय. ज्या महापुरुषांनी चंद्रपूरचा गौरव वाढवला आहो, तो पुढे नेण्याची आपली जबाबदारी आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

आदिवासी समाजाच्या पाठीशी
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि परिणामकारक पावले उचलली जात आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना सक्षम करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे.समाजातील तरुण-तरुणींना संधी, मार्गदर्शन आणि प्रेरणा देत “संकल्प, सहकार्य आणि सातत्य” या त्रिसूत्रीच्या बळावर आदिवासी समाजाच्या उज्ज्वल भविष्याची वाट अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.


Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page