*योग हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली : डॉ. अशोक जीवतोडे*
*जागतिक योग दिनानिमित्त डॉ. अशोक जीवतोडे यांचे निरोगी जीवनाचे आवाहन*
*जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात जागतिक योग दिन साजरा; शेकडो नागरिकांचा सहभाग*
*ज्योत्स्ना वानखेडे*
चंद्रपूर येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते आणि तणावमुक्त, संतुलित जीवन जगण्यास मदत मिळते, असे त्यांनी सांगितले. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले. निरोगी, सुदृढ आणि सकारात्मक समाजाच्या निर्मितीसाठी योग संस्कृतीचा प्रसार ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा जागतिक योग दिन शनिवारी (दि. २१) स्थानिक जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या योग सत्रात शेकडो नागरिक, विद्यार्थी व योगप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध योगासने व प्राणायामाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई जीवतोडे, ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, डॉ. कुचनकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे, प्राचार्य डॉ. राजेंद्र भगत, प्रतिष्ठित नागरिक राजेश भोजेकर, प्रमोद काकडे, हैदर शेख, सारंग पांडे, धनंजय शास्त्रकार, आदि उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करत निरोगी शरीर आणि सुदृढ मनासाठी योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले.
यावेळी योगगुरू मधुकर राजूरकर, राजकुमार गावंडे, सुनीता गावंडे, अनिता खामणकर, माधवी चार्लीकर, मनीषा वासलवार, रश्मी दासरवार, मायाताई बेले आदी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेकडो उपस्थितांनी योगाचा लाभ घेत निरोगी जीवनाचा संकल्प केला.
या उपक्रमामुळे जनता महाविद्यालय परिसरात आरोग्यासंबंधी सकारात्मकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.