*बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील कथित गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करा; माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी*
*बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील कथित गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करा; माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी*
बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे असलेल्या बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT) येथील प्रवेश प्रक्रियेत कथितरीत्या झालेल्या गंभीर गैरप्रकारांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे केली आहे.
या पत्रामुळे संबंधित प्रकरणाला राज्यस्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. सारथी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, चंद्रपूरचे अध्यक्ष देवेंद्र सायसे यांनी सादर केलेल्या निवेदनाचा संदर्भ देत आमदार मुनगंटीवार यांनी हे प्रकरण शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
निवेदनात संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार आणि विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांच्या शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने त्यांची स्वतंत्र व सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, CAP राऊंडमध्ये कथित बनावट किंवा कृत्रिम प्रवेश नोंदी तयार करण्यात आल्याचा आरोप असून, प्रवेश जाणूनबुजून रद्द करून व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशसंख्या वाढविण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात अवैध कॅपिटेशन फी वसूल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय संस्थेतील कर्मचारी व प्राध्यापकांच्या शैक्षणिक कागदपत्रांचा कथित गैरवापर करण्यात आल्याचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन दिले जात नसल्याचे, प्रत्यक्ष दिल्या जाणाऱ्या वेतनात आणि दाखविण्यात येणाऱ्या वेतनात तफावत असल्याचे तसेच विद्यार्थ्यांकडून विविध शुल्कांच्या नावाखाली अवैध वसुली करण्यात येत असल्याचे आरोप निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर आणि नैतिकतेवर गंभीर परिणाम होत असल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली आहे.
आमदार मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात असेही नमूद केले आहे की, संस्थेकडून तांत्रिक शिक्षणाशी संबंधित नियामक संस्था AICTE (All India Council for Technical Education) यांच्याकडे चुकीची माहिती सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित सामाजिक संस्थेने यापूर्वीही प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारी करून कारवाईची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याने शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या सर्व आरोपांची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्यासाठी सक्षम यंत्रणेमार्फत तपास करून दोषी अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी स्पष्ट मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, एका लोकप्रतिनिधीने थेट शिक्षण मंत्र्यांकडे या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केल्यामुळे बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील कथित गैरप्रकारांचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, आता शासन या तक्रारीची कितपत गंभीर दखल घेते आणि पुढे कोणती प्रशासकीय पावले उचलते, याकडे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधितांचे लक्ष लागले आहे.