कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे महत्त्वपूर्ण मागणी; प्रत्येक तालुक्यात ‘हेल्प डेस्क’ उभारण्याचा आग्रह
ई-केवायसी, ॲग्रीस्टॅक, बँक पडताळणी, लाभार्थी यादीतील त्रुटींसह सर्व अडचणींचे एकाच ठिकाणी निराकरण करण्याची आ. मुनगंटीवार यांची मागणी
एकही पात्र शेतकरी तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणामुळे कर्जमाफीपासून वंचित राहू नये; मयत शेतकऱ्यांच्या वारसांसाठीही स्वतंत्र कार्यपद्धतीचा आग्रह

*Jyotsna Wankhede*: शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने संवेदनशील भूमिका घेणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. योजनेचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत वेळेत आणि कोणत्याही अडथळ्याविना पोहोचावा, तसेच ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅक, बँक खात्याची पडताळणी, लाभार्थी यादीतील त्रुटी, ऑनलाइन पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि विविध विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना होणारा मनस्ताप दूर व्हावा, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मदत कक्ष (Help Desk)’ तातडीने स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, त्यांच्या सर्व समस्या एकाच ठिकाणी सोडविल्या जाव्यात आणि केवळ तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे एकही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये, हीच आमदार सुधीर मुनगंटीवार यांची शेतकरीहिताची भूमिका या मागणीतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.
आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र मदत कक्ष सुरू करून त्यामध्ये महसूल, सहकार, कृषी विभाग, संबंधित राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँका, सीएससी केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र तसेच योजनेशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी निश्चित वेळापत्रकानुसार उपस्थित राहण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. या मदत कक्षामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व अडचणींचे तात्काळ निराकरण, तक्रार नोंदणी, अर्जाच्या स्थितीची माहिती, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन तसेच संबंधित अधिकाऱ्यांची संपर्क माहिती उपलब्ध करून देण्याचाही आग्रह आ. मुनगंटीवार यांनी धरला आहे.
तसेच अनेक शेतकऱ्यांचे सीएससी केंद्रामार्फत ई-केवायसी पूर्ण होत नसल्याने ते कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा शेतकऱ्यांची तातडीने पडताळणी करून पर्यायी पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. याशिवाय मयत शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या कायदेशीर वारसांना लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याने मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र व अन्य आवश्यक कागदपत्रांच्या आधारे विशेष कार्यपद्धती निश्चित करून त्यांना लाभ देण्याची व्यवस्था करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
पात्र असूनही लाभार्थी यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची तात्काळ तपासणी करून त्यांना न्याय द्यावा, तसेच प्रत्येक मदत कक्षाच्या कामकाजाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, अशी मागणीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ कोणत्याही पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.










