Friday, August 7, 2026
spot_img
HomeHealth & Fitnessग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याचा संकल्प – आ. सुधीर...

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याचा संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याचा संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार

आ.मुनगंटीवार यांच्या हस्ते शिवणी चोर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

१५ दिवसांत बेबी वॉर्मर उपलब्ध करून देण्याची आमदार सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

आरोग्य हीच खरी संपत्ती; महिलांच्या आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य व्यवस्थेवर भर

*Jyotsna Wankhede*: ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला शहरांप्रमाणेच दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मौजा शिवणी चोर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपकेंद्राची पाहणी करून त्यांनी येत्या १५ दिवसांत बेबी वॉर्मर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. शिवणी चोर, हडस्ती, चारवट, हिंगणाळा, आरवट आणि भीमनगर या गावांतील नागरिकांना या उपकेंद्राच्या माध्यमातून अधिक सक्षम, सुलभ व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमापूर्वी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच श्री हनुमान मंदिरात दर्शन घेऊन ग्रामदैवताचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीचे अधिकृत लोकार्पण करत ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, गटविकास अधिकारी (चंद्रपूर) संगीता भांगरे, गटविकास अधिकारी (बल्लारपूर) धनंजय साळवे, सरपंच रवींद्र पहाणपट्टे, सरपंच सुलभाताई भोंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य, भाजपा तालुका अध्यक्ष श्रीनिवास जंगमवार, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत देऊळकर, ग्रामपंचायत सदस्य शंकर लोनगाडगे, सखुबाई निब्रड, संजय मडावी, मायाताई पहाणपट्टे, गणेश भोयर, बाबुराव बुराण, सत्यशीला भोयर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, “सर्वात मोठी संपत्ती ही आरोग्य आहे. योग्य वेळी आजाराचे निदान झाले तर मोठे संकट टाळता येते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.” जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मांडलेली फॅमिली फोल्डर रजिस्टर ही संकल्पना नागरिकांच्या आरोग्याचा सातत्याने मागोवा घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून तिच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

गावात भारतमातेचे चित्र पाहून समाधान व्यक्त करत त्यांनी, “भारत माता की जय म्हणणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच निरोगी भारत घडविण्यासाठी स्वतःचे आरोग्य जपणेही आवश्यक आहे,” असे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.

महिलांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करत आ. मुनगंटीवार म्हणाले की, अनेक माता-भगिनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांनी नियमित आरोग्य तपासणी करून कोणताही आजार अंगावर काढू नये. युवकांनी गुटखा, तंबाखू, दारू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील आरोग्य क्षेत्रात करण्यात आलेल्या विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी, ३१ दवाखान्यांचे स्मार्ट पीएचसीमध्ये रूपांतर, उमरी पोतदार प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रसूती कक्षाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. तसेच एसएनडीटी विद्यापीठाजवळ सुमारे २०० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ईएसआयसी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हेच आपल्या विकास धोरणाचे केंद्रबिंदू असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

“माझ्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात आनंदाचा दिवस तो असेल, ज्या दिवशी चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही आरोग्य शिबिरे घेण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम आणि सशक्त करणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त करत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य क्षेत्रातील विविध संस्थांचे बळकटीकरण करण्याची गरज अधोरेखित केली.

शिवणी चोर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात येत्या १५ दिवसांत बेबी वॉर्मर उपलब्ध करून नवजात बालकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळ देण्यात येईल, अशी घोषणा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.यावेळी उपकेंद्रातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संबोधित करत शासनाने सोपविलेली जबाबदारी अधिक संवेदनशीलतेने पार पाडण्याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. लसीकरण, प्रसूती सेवा, आरोग्य तपासणी तसेच नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी तत्पर राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, माझे वडील डॉक्टर असताना शिवणी चोर परिसरातील अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हा संस्कार मला त्यांच्याकडून मिळाला असून तोच भाव आजही माझ्या सार्वजनिक जीवनात कायम आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page