ज्योत्स्ना वानखेडे:
श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विक्रमशिला तंत्रनिकेतन, दारापूर येथे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादात आता विद्यार्थ्यांनी उडी घेतली आहे. उन्हाळी परीक्षा २०२६ चे केंद्र अचानक बदलल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी, ८ एप्रिल रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप तुळशीराम इंगोले आणि संस्थेच्या सचिवाना घेराव घालून जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
**नेमके प्रकरण काय?**
मिळालेल्या माहितीनुसार, हिवाळी परीक्षा २०२५ दरम्यान कर्मचाऱ्यांनी आपल्या थकीत वेतनाची मागणी केली असता, प्राचार्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना परीक्षा कालावधीसाठी निलंबित केले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यात आले. मात्र, जानेवारी २०२६ पासून प्राचार्य डॉ. इंगोले यांनी ‘कर्मचारी सहकार्य करत नाहीत’ असे कारण पुढे करून परीक्षा केंद्र दारापूर येथून इतरत्र हलवण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडे (MSBTE) वारंवार पत्रव्यवहार सुरू केला होता.
दुसरीकडे, कर्मचारी संघटना आणि विद्यार्थ्यांनी याला तीव्र विरोध केला. दारापूर ते अमरावती हे ४० किलोमीटरचे अंतर (येण्या-जाण्यासह ८० किमी) ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या कठीण असल्याचे गाऱ्हाणे विद्यार्थ्यांनी मांडले होते.
**MSBTE समितीच्या पाहणीत धक्कादायक वास्तव**
या वादाची दखल घेत १ एप्रिल २०२६ रोजी MSBTE च्या उपसचिव डॉ. कांचन मानकर, सहाय्यक उपसचिव दिलीप लिल्हारे, प्रणाली व्यवस्थापक श्रीमती राजे आणि प्रा. बेलसरे यांच्या समितीने महाविद्यालयाला भेट दिली. धक्कादायक बाब म्हणजे, समिती येणार असल्याची पूर्वसूचना ३० मार्च रोजीच देण्यात आली असतानाही, प्राचार्य डॉ. इंगोले त्यादिवशी जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले.
समितीने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, ४ मार्च २०२६ पासून प्राचार्यांनी महाविद्यालयातील प्रयोगशाळांना बेकायदेशीरपणे टाळे ठोकले असून तेथील साहित्यही हलवण्यात आले आहे. या गंभीर प्रकारावर समितीने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, मुंबई कार्यालयाचे सचिव मारुती जाधव यांनी ८०० हून अधिक विद्यार्थी असल्याने केंद्र हलवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते, ज्यावर प्राचार्यांनी परीक्षा दारापूरलाच होईल अशी हमी दिली होती.
**हॉल तिकीटमधील बदलामुळे संताप**
७ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाऊनलोड केले असता त्यावर परीक्षा केंद्र ‘विक्रमशिला तंत्रनिकेतन, दारापूर’ असेच होते. मात्र, दुपारी ३:०० नंतर अचानक पोर्टलवर केंद्र बदलल्याचे दिसून आले. प्रशासनाचा हा दुटप्पीपणा पाहून विद्यार्थ्यांनी आज प्राचार्यांना जाब विचारत घेराव घातला.
**विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:**
१. परीक्षा केंद्र दारापूरलाच ठेवण्यात यावे.
२. केंद्र बदलल्यास प्रशासनाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करून द्यावी.
३. बेकायदेशीरपणे बंद केलेल्या प्रयोगशाळा त्वरित उघडण्यात याव्यात.
**संस्था बंद करण्याच्या प्रयत्नाला न्यायालयाचा लगाम**
व्यवस्थापन मागील दोन वर्षांपासून ही संस्था बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मात्र, **मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने** कर्मचाऱ्यांची सर्व देणी दिल्याशिवाय संस्था बंद करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाचे उल्लंघन टाळण्यासाठी व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य पणाला लावले जात असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.
या आंदोलनामुळे आता तंत्रशिक्षण मंडळ आणि शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.