निवडणूक कर्तव्यातील त्रुटींची गंभीर दखल; मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई
*ज्योत्स्ना वानखेडे*
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील तरतुदी तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 अन्वये जि.प. प्राथमिक शाळा, चोगान (ता. ब्रह्मपुरी) येथील मुख्याध्यापिका श्रीमती छाया माणिक खुणे यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार, संबंधित मुख्याध्यापिकेकडे मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, दुरुस्ती, पडताळणी व निवडणूक विषयक कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, संबंधित कर्तव्ये पार पाडताना निर्वाचन आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यात त्रुटी, कामकाजात आवश्यक दक्षता न घेणे तसेच कर्तव्यात कसूर झाल्याचे अहवालातून निदर्शनास आल्याचे आदेशात नमूद आहे.
आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी सादर केलेले अहवाल, उपलब्ध कागदपत्रे व अभिलेख यांचा विचार करून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4 अन्वये निलंबनाची शिस्तभंगात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
निलंबन कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांचे मुख्यालय शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे निश्चित करण्यात आले असून, सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच, नियमानुसार त्यांना निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
ही कारवाई प्रशासकीय अहवाल, उपलब्ध पुरावे आणि लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींच्या आधारे करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेत नियुक्त प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने सोपविण्यात आलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश या आदेशातून अधोरेखित झाला आहे.