भगवान बुद्धांचा शांतता, समता आणि करुणेचा संदेश समाजाला दिशा देणारा – आ. किशोर जोरगेवार
मैत्री बौद्ध विहार येथे वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन
*Jyotsna Wankhede*:
मैत्री बौद्ध विहार येथे आयोजित वर्षावास कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून समाज बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे स्मरण करत शांतता, करुणा, समता आणि बंधुभावाचा संदेश समाजासाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, भगवान गौतम बुद्धांनी मानवतेला दिलेला समतेचा, करुणेचा आणि शांततेचा विचार आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. समाजात परस्पर सन्मान, बंधुभाव आणि सहकार्याची भावना मजबूत करण्यासाठी या विचारांचे आचरण होणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार आणि सामाजिक एकोप्याच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देता येते.
यावेळी आमदार जोरगेवार यांनी उपस्थित समाज बांधवांशी विविध सामाजिक विषयांवर संवाद साधत त्यांच्या भावना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, सामाजिक जाणीव आणि परस्पर सहकार्याला अधिक बळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत विकासाच्या प्रक्रियेत योगदान देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
वर्षावासाच्या निमित्ताने समाज बांधवांनी एकत्र येत भगवान बुद्धांच्या विचारांचे चिंतन करणे ही सकारात्मक बाब आहे. अशा धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील एकोपा अधिक दृढ होण्यासोबतच नव्या पिढीला आपल्या समृद्ध विचारपरंपरेची ओळख होते. सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची ही परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यावेळी मैत्री बौद्ध विहाराचे पदाधिकारी, समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती.