भद्रावती ट्रेझरीत कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
श्रेयश वानखेडे :-
भद्रावती तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या ट्रेझरी कार्यालयात रात्रीच्या वेळेस कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी शनिवारला रात्री घडली.
मधुकर कोंडू आत्राम, वय ५५ वर्ष, रा.चंद्रपूर असे मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते भद्रावती पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.मृतक मधुकर आत्राम यांची नेहमी येथील ट्रेझरी कार्यालयात रात्रीची ड्युटी राहत होती.घटनेच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर झाल्यानंतर बऱ्याच वेळाने ट्रेझरी कार्यालयातील लाईट बंद दिसल्याने शेजारील शासकीय विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याने जाऊन पाहिले असता ते झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यांना शंका आल्याने त्यांनी पोलिस स्टेशन येथे फोन केले.
पोलीस घटनास्थळी आल्यानंतर आत्राम मृता अवस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे दोन मुले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.